Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कोथरूड (पुणे) येथे 'अमळनेरकर महाराज सेवा संघा'च्या वतीने भव्य 'नऊकुंडी दत्तयाग' आणि 'वायनदान' पूर्णाहुतीने सोहळा पार पडला !

कोथरूड (पुणे) येथे 'अमळनेरकर महाराज सेवा संघा'च्या वतीने भव्य 'नऊकुंडी दत्तयाग' आणि 'वायनदान' पूर्णाहुतीने सोहळा पार पडला !

पुणे, ३० मे (वार्ता.) - पुरुषोत्तममासाचे परम पावन औचित्य साधून 'अमळनेरकर महाराज सेवा संघ, पुणे' यांच्या वतीने कोथरूड येथील शिवदर्शन सभागृहात आयोजित करण्यात आलेला ३ दिवसांचा 'नऊकुंडी दत्तयाग' अत्यंत मंगलमय आणि भावपूर्ण वातावरणात पूर्णाहुतीने पार पडला.

२८, २९ आणि ३० मे या कालावधीत पार पडलेल्या या ऐतिहासिक सोहळ्यासाठी 'अमळनेरकर महाराज सेवा संघा'च्या भक्तांनी गेल्या ३ महिन्यांपासून घेतलेल्या अथक परिश्रमामुळे हा कार्यक्रम अभूतपूर्व यशस्वी ठरला.

नामजपाने आपल्या मनाची शुद्धी होत असते, तर यज्ञयागाने वातावरणाची शुद्धी होते. पुरुषोत्तममासामध्ये श्रीकृष्णाची भक्ती आणि उपासना केली, तर उपासकाला त्याचा पुष्कळ लाभ होतो. जाळीदार पदार्थ भगवंताच्या गुणाला समर्पित केला जातो आणि तो केल्यानंतर आपल्यातील दोषाचे निवारण होते.

या दिव्य यागामध्ये सर्वश्री सुरेश नाईक, प्रकाश दत्तात्रय देशपांडे, संजय खांदाट, मुकुंद देशपांडे, श्रीपाद गोरे आणि चंद्रशेखर वैद्य, ओंकार पुजारी, आशिष दुदगीकर, ऋतुराज देशपांडे, गौरव दुदगीकर या १० यजमानांनी सपत्नीक ३ दिवस यज्ञकर्मात सहभाग घेतला.

प्रतिदिननुसार सकाळी पांडुरंगाचीपूजा, श्लोकपठण आणि आरती झाली. या वेळी गुरुभक्तीपर गीतांचे गायन झाले.

या उत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे 'वायनदान' (वायनिदान). ही प्राचीन हिंदु धार्मिक परंपरा आहे. वायू किंवा प्राण यांच्या स्थिरतेसाठी, मानसिक शांततेसाठी आणि वंशाच्या वृद्धीसाठी हे दान केले जाते. धर्मीय श्रद्धेनुसार, वायू तत्त्व अस्थिर झाल्यास तणाव, चंचलता आणि आरोग्य बिघडते; अशा वेळी हे दान केल्याने आरोग्य आणि सौख्य लाभते.

दत्तयागाच्या शेवटच्या दिवशी भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन वििवध वस्तूंचे श्रद्धेने वायनदान केले.

सदर कार्यक्रमात यज्ञातील सहभागी यजमानांना प्रत्यक्ष पूजा आणि अभिषेक सुलभ व्हावा, या हेतूने तांब्याच्या धातूवरील दत्ताची आणि 'श्री'ची प्रतिमा असलेले नाणे भेट दिले. या सोहळ्यात अमूल्य योगदान देणार्‍या व्यक्तींना सद्गुरु सखाराम महाराज यांची मूर्ती भेट देऊन सन्मानित केले.

सनातन संस्थेच्या वतीने श्री. सुरेंद्र वाटवे यांनी प.पू. प्रसाद महाराज यांचे पूजन करून त्यांना शाल, श्रीफळ, पेढे आणि हार अर्पण केला.

'अष्टविनायक गणपति, मोरगाव' येथील क्षेत्रोपाध्याय श्री. विजय यज्ञेश्वर ढेरे आणि ३० मे या दिवशी उपस्थित राहिलेले शंतनू लोहोणेरकर महाराज यांच्या उपस्थितीने सोहळ्याची शोभा अधिकच वाढली. दत्तयागाच्या शेवटच्या दिवशी २ सहस्र ५०० हून अधिक भाविकांनी अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेत दर्शन घेऊन या आध्यात्मिक सोहळ्याचा, तसेच महाप्रसादाचा लाभ घेतला. ज्यामुळे संपूर्ण कोथरूड परिसर दत्तनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.

२९ मे या दिवशी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या सोहळ्याला भेट देऊन दत्तयाग आणि प.पू. प्रसाद महाराज यांचे दर्शन घेतले, तसेच ते सायंकाळच्या धूपारतीलाही उपस्थित होते. रात्री माजलगावचे ह.भ.प. श्री. लक्ष्मीप्रसाद कुलकर्णी (पटकरी) यांच्या सुश्राव्य कीर्तनाने भक्तीचा सोहळा पार पडला.

या मंगल प्रसंगी श्री सद्गुरु प्रसाद महाराज अमळनेरकर यांच्या प्रेरणेने 'श्री संत सखाराम महाराज चरित्र लीलामृत' या 'ऑडिओ-व्हिज्युअल' (दृक श्राव्य) ग्रंथाचे २८ मे या दिवशी विमोचन करण्यात आले. हे चरित्र आता सर्व भाविकांसाठी 'यू ट्यूब' या माध्यमातून उपलब्ध करून दिले आहे. सौ. विद्या मदन कुलकर्णी यांनी याविषयी माहिती दिली. भाविकांना लाभ व्हावा, या दृष्टीने 'यू ट्यूब'ची लिंक पुढे दिली आहे.

https://sl1nk.com/ov4nc18

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi