नाशिक - नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने आयोजित त्रिदिवसीय 'कुंभ भक्ती संगमा'च्या पहिल्या दिवसाची सांगता प्रसिद्ध गायक श्री. राहुल देशपांडे यांच्या 'अभंगवारी' या भक्तीसंगीत मैफिलीने झाली.
ठक्कर डोम येथे झालेल्या या सोहळ्यात 'राजस सुकुमार', 'खेळ मांडियेला', 'तीर्थ विठ्ठल', 'अबीर गुलाल' अशा विविध भावपूर्ण अभंगांसह 'कानडा राजा पंढरीचा' या रचनेच्या सादरीकरणाने संपूर्ण परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला. प.पू. अमृताश्रम स्वामी महाराज यांच्या कीर्तनाने प्रारंभ झालेल्या या पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमात सौ. दीप्ती माटे (सहगायन), श्री. विघ्नेश जोशी (निवेदन) आणि सहकलाकारांच्या सुरेल संगीतसाथीने रंग भरला, तर उपस्थित भाविक आणि संगीतप्रेमी रसिकांनी या चैतन्यमय मैफिलीस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
नाशिकमधील ठक्कर डोम येथे चालू असलेल्या 'कुंभ भक्ती संगम' महोत्सवात दुसर्या दिवशी म्हणजेच २९ ऑगस्टला रात्री ८ ते १० या वेळेत लोकप्रिय गायिका आणि आमदार मैथिली ठाकूर यांच्या भजनाचा विशेष कार्यक्रम पार पडला. त्यापूर्वी दिवसभर 'भक्ती संमेलन'च्या माध्यमातून भारतीय संतपरंपरा, समरसता आणि राष्ट्रीय स्तरावरील संतपरंपरेचा सहभाग अन् समन्वय यांवर विचारमंथन करण्यात आले.

