नगर - कुटुंबातील आप्तजनांपेक्षा भ्रमणभाष अधिक प्रिय झाल्याने जीवनातील दु:ख वाढत चालले आहे. कलीयुगात वृत्ती आसुरी होत चालली आहे. भ्रमणभाष आपल्या जीवनात मोठी हानी करत आहे, हे कळत असूनही जेवतांनाही भ्रमणभाषमध्ये व्यस्त रहाण्यात धन्यता मानली जाऊ लागली आहे, असे मार्गदर्शन पुणे येथील इस्कॉन मंदिराचे ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास यांनी केले.
नगर येथील नवीन टिळक रस्त्यावरील 'माऊली सांस्कृतिक भवना'मध्ये आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद्भागवत कथा निरूपण सोहळ्याच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.
श्रीमान रेवतीनंदन दास पुढे म्हणाले, ''भगवान श्रीकृष्णाच्या गुणांचे वर्णन असलेल्या भागवताच्या श्रवणाने वैकुंठ प्राप्ती होते. अधिक महिना भगवंताला प्रिय आहे. या महिन्यात केलेल्या भक्तीचे फळ सहस्रोपट अधिक मिळते. स्कंद आणि पद्म पुराण भागवताचे गुणगान करतात. सत्ता, संपत्ती, पद, प्रतिष्ठा, मान-सन्मान, घमेंडीवृत्ती हे सोडून भगवंताच्या जवळ गेलो तरच भगवंताला समजून घेता येते. भक्ती, ज्ञान, वैराग्य पुष्ट झाली की, विवेक येतो. आत्महत्या करून समस्या सुटत नसतात उलट आणखी दु:खाचा सामना करावा लागतो.''
महापौर सौ. ज्योतीताई गाडे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे यांच्या हस्ते राधा-कृष्ण विग्रह पूजन आणि दिपप्रज्वलन करण्यात आले. सौ. गाडे यांचा सन्मान डॉ. अंजली फाटके यांच्या हस्ते तर सौ. विखे यांचा सन्मान कमलिनीदेवी दास यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी इस्कॉन मंदिराचे व्यवस्थापक गिरीवरधारी दास, नेवासाचे माजी आमदार संभाजीराव फाटके, अण्णासाहेब फाटके, वैष्णवतोष्णी दास, डॉ. सतीश फाटके आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. गिरीवरधारी दास यांनी उपस्थित श्रोतृवृंदाचे स्वागत करून डॉ. सतीश फाटके यांच्या विशेष पुढाकाराने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती देऊन कथा निरूपण करणारे श्रीमान रेवतीनंदन दास यांचा परिचय करून दिला. सौ. शालिनीताई विखे आणि सौ. ज्योतीताई गाडे यांनी अधिक महिन्यात इस्कॉनने आयोजित केलेल्या या सोहळ्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

