(इंडिया स्टिल स्टँडिंग म्हणजे भारत अजूनही उभा आहे.)
नवी देहली - लेखक आणि आध्यात्मिक अभ्यासक पद्मश्री पुरस्कारप्राप्त स्टीफन नॅप यांनी त्यांचे नवीन पुस्तक प्रकाशित केले आहे. 'इंडिया स्टिल स्टँडिंग : ओव्हरकमिंग दी इव्हेंट्स दॅट ट्राईड टू डिस्ट्रॉय इंडिया अँड इट्स कल्चर', म्हणजेच 'भारत अजूनही उभा आहे : अशा घटना ज्या भारत आणि त्याची संस्कृती यांना नष्ट करण्यासाठी प्रयत्नरत होत्या', असे या नूतन प्रकाशनाचे नाव आहे.
भारताच्या प्राचीन वैदिक परंपरांचे जतन आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने या पुस्तकातून इतिहासाकडे पहाण्याचा एक पर्यायी दृष्टीकोन मांडण्यात आला आहे.
स्टीफन नॅप सांगतात की, 'एन्.सी.ई.आर्.टी'सारख्या शाळांमधील मानक अभ्यासक्रमांमध्ये इतिहासातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी वगळण्यात आल्या आहेत. या पुस्तकात त्यांनी असा युक्तीवाद केला आहे की, प्रचलित इतिहास बहुधा परकीय आक्रमकांचे उदात्तीकरण करतो. तसेच आक्रमकांनी केलेल्या आक्रमणांचे मूळ भयानक स्वरूप आणि त्याची तीव्रता यांकडे दुर्लक्ष करतो. पुस्तकातील १३ सविस्तर प्रकरणांमधून भारतावर शतकानुशतके झालेली आक्रमणे, मंदिरांचा विध्वंस आणि काश्मीरसारख्या प्रदेशांमधील सुरक्षेची आव्हाने यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यासमवेतच देशाचा वारसा जपण्यासाठी लढा देणारे पारंपरिक रक्षक, स्थानिक प्रतिकार चळवळी आणि आध्यात्मिक नेत्यांचा गौरवही यात करण्यात आला आहे.
नॅप पुढे सांगतात की, या सर्व संकटे आणि संघर्ष यांचा इतिहास मांडलेला असतांनाही हे पुस्तक अत्यंत आशावादी दृष्टीकोन बाळगून आहे. आधुनिक काळात भारताची टिकून राहिलेली सांस्कृतिक क्षमता, वाढता जागतिक प्रभाव आणि एकसंध ओळख यांवर हे पुस्तक भर देते. नॅप यांनी हे पुस्तक एका आवाहनाच्या रूपात सादर केले असून भारताचे प्राचीन आध्यात्मिक ज्ञान जागतिक स्तरावर सुरक्षित ठेवण्यासाठी आणि ते पुढे नेण्यासाठी वाचकांनी 'वैदिक राजदूत' म्हणून कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
हे पुस्तक जगभरात 'ॲमझॉन'वर पेपरबॅक (छापील) आणि ई-बुक (eBook) दोन्ही स्वरूपात उपलब्ध आहे.
पुस्तक प्रकाशनाचा दिनांक : २४ जुलै २०२६
पृष्ठसंख्या : ३७४
भारतातील मूल्य (हार्ड कॉपी, म्हणजेच प्रत्यक्ष पुस्तक) : ३ सहस्र रुपये, तर ई-बुक : ९६ रुपये

