कोल्हापूर, २ जून (वार्ता.) - पावसाळ्यात कृष्णा-पंचगंगा नद्यांना पूर येऊन पाणीपातळी वाढते. याचा मोठा धोका कोल्हापूर जिल्ह्याला बसतो. कृष्णा नदी पुढे कर्नाटक येथे जाते, त्या अनुषंगाने आलमट्टी धरण, तसेच त्याअगोदर असलेले हिप्परगी धरण यांच्यामुळे निर्माण होणारी महापुरासारखी परिस्थिती उद्भवू नये; म्हणून कर्नाटक सरकारशी सातत्याने समन्वय चालू आहे.
गेल्या आठवड्यात कर्नाटक शासनासमवेत उच्चस्तरीय बैठक झाली, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
१. पावसाळ्याच्या पूर्वी ग्रामीण भागात असलेले लाकडी पूल, तसेच छोटे पूल यांच्या संदर्भातील माहिती एकत्र करून त्यांची स्थिती अभ्यासण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आपत्कालीन यंत्रणेच्या संदर्भातही बैठक घेऊन सूचना देण्यात आल्या आहेत.
२. पंचगंगा नदी प्रदूषणाच्या सूत्रावर बैठकीत गांभीर्याने चर्चा करण्यात आली. कोल्हापूर शहरापासून पुढे असणार्या गावांना प्रदूषणाचा गंभीर प्रश्न भेडसावत आहे. या संदर्भात महापालिका प्रशासन, तसेच अन्य सर्व संबंधित विभाग यांची प्रत्येकी १५ दिवसांनी बैठक घेऊन उपाययोजना काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 'श्री महालक्ष्मीदेवी मंदिर विकास आराखड्या'वरही या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
३. जिल्ह्याचा ६४२ कोटी रुपयांचा विकास आराखडा संमत करण्यात आला असून आराखड्याचा ६० टक्के निधीचा व्यय झालेला आहे. या निधीचे सर्वांना समान वाटप करण्यात येणार आहे.

