Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मालवण समुद्रात मासेमारी नौका उलटून २ मासेमारांचा मृत्यू

मालवण समुद्रात मासेमारी नौका उलटून २ मासेमारांचा मृत्यू

मालवण - सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पाठीमागील खडकाळ समुद्रात १ सप्टेंबरला सकाळी मासेमारीसाठी गेलेली 'सागरिका' ही लहान मासेमारी नौका मोठ्या लाटेच्या तडाख्यामुळे उलटली. या दुर्घटनेत नौकेतून समुद्रात फेकले गेल्याने दांडी येथील भाजपचे स्थानिक पदाधिकारी तथा मासेमार सन्मेष सुरेश परब (वय ४९ वर्षे) आणि अक्षय हनुमंत राणे (वय ३० वर्षे) या दोघांचा बुडून मृत्यू झाला, तर सुयोग सन्मेष परब (वय २२ वर्षे) याला स्थानिक मासेमारांनी प्रसंगावधान दाखवत सुखरूप बाहेर काढले आहे.

नौका उलटल्यानंतर सुयोग परब हा पाण्यात पोहत असल्याचे जवळच असलेल्या जयदेव लोणे यांच्या नौकेतील मासेमारांना दिसल्यानंतर त्यांनी तातडीने सुयोगला स्वत:च्या नौकेत घेतल्याने तो वाचला; मात्र सन्मेष परब आणि अक्षय राणे हे दोघे समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने बेपत्ता झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक मासेमारांनी तातडीने शोधमोहीम हाती घेतली. काही वेळातच सन्मेष परब यांचा मृतदेह किल्ल्यानजीकच्या समुद्रात आढळून आला, तर थोड्या वेळाने अक्षय राणे यांचाही मृतदेह शोधण्यात यश आले.

पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून दुःख व्यक्त

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी त्यांच्या 'एक्स' या सामाजिक माध्यमातून, 'ही दुर्घटना अत्यंत दुःखद आहे. सन्मेश परब आणि अक्षय हनुमंत राणे यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याचे आणि या कठीण प्रसंगातून सावरण्याचे बळ त्यांच्या कुटुंबियांना मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !', अशा शब्दांत सहवेदना व्यक्त केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi