नवी देहली - 'ब्रिक्स' या परंपरागत ब्राझिल, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या समूहाला गेल्या काही वर्षांत जागतिक स्तरावर प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. या गटात अन्यही अनेक देश जोडले गेले असले, तरी या ५ देशांच्या अर्थव्यवस्था जगात सर्वाधिक गतीने वाढत आहेत.
अशात काही पाकिस्तान आणि इराण समर्थक 'एक्स' खात्यांवरून असा दावा केला गेला की, भारताने अमेरिकेच्या दबावापुढे झुकत 'ब्रिक्स'मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पाकिस्तानला लवकरच या गटात सहभागी करून घेतले जाईल. ही अफवा मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने ती फेटाळून लावत हे दावे खोटे आणि निराधार असल्याचे स्पष्ट केले.
या अफवांमध्ये काही खात्यांनी असाही दावा केला होता की, व्यापार व्यवहारांसाठी अमेरिकी डॉलरऐवजी स्थानिक चलनांचा वापर करण्याच्या 'ब्रिक्स' देशांनी मांडलेला प्रस्ताव भारताने फेटाळून लावला आहे. याव्यतिरिक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका इस्रायलच्या बाजूने झुकलेली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाच्या 'तथ्य-तपासणी' (फॅक्ट चेक) करणार्या अधिकृत खात्यावरून हे दावे पूर्णपणे खोटे असल्याचे म्हटले आहे.

