नाशिक - मुंबई आतंकवादविरोधी पथकाचे नाव सांगून सायबर गुन्हेगारांनी वाहन निर्मिती करणार्या एका नामांकित आस्थापनाच्या व्यवस्थापकाला 'डिजिटल अरेस्ट'ची ('डिजिटल अरेस्ट' म्हणजे स्वतःची खोटी ओळख सांगून ऑनलाईन अटक करणे) भीती दाखवत ८९ लाख ९९ सहस्र रुपयांची फसवणूक केली.
'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'च्या चौकशीच्या नावाखाली ही फसवणूक करण्यात आली. 'आंतरराष्ट्रीय आतंकवादी आणि 'मनी लाँड्रिंग' (काळा पैसा पांढरा करणे) प्रकरणात तुमचे नाव आले आहे', असे आरोपींनी खोटे सांगितले. आरोपींनी व्यवस्थापकाचे आधारकार्ड वापरून आतंकवादी आदिल गौरी याने जम्मूमध्ये बनावट बँक खाते उघडल्याची खोटी भीती दाखवली. त्यांनी व्यवस्थापकाला १७ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट या कालावधीत त्यांच्या स्वतःच्या घरातच 'डिजिटल अरेस्ट' करून ठेवले. त्यानंतर बँकेच्या चौकशीची भीती दाखवून विविध बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास भाग पाडले. वरीलप्रमाणे पैसे जमा होताच आरोपींनी ती रक्कम इतर विविध खात्यांमध्ये वळवून फसवणूक केली. हे लक्षात आल्यावर व्यवस्थापकाने पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली.

