Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मुंबई, पुणे, नाशिकसह महाराष्ट्रातून लाखो रुपयांचा भेसळयुक्त साठा आणि प्रतिबंधित गुटखा जप्त !

मुंबई, पुणे, नाशिकसह महाराष्ट्रातून लाखो रुपयांचा भेसळयुक्त साठा आणि प्रतिबंधित गुटखा जप्त !

मुंबई - कडक, शिस्तप्रिय आणि पारदर्शक कार्यपद्धतीसाठी प्रसिद्ध असलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न अन् औषध प्रशासन आयुक्तपदाचा कारभार हाती घेतला. पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या ३ दिवसांतच त्यांनी राज्यभरात विशेष धडक मोहीम चालू करून ३ दिवसांत ५३ ठिकाणी धाडी घालून ३३ जणांना अटक केली.

जनतेच्या आरोग्याशी खेळणार्‍या आणि अनधिकृत अन् बेकायदेशीर कृत्य करणार्‍या आस्थापनांना कडक चेतावणी देत प्रशासनाने मुंबई, पुणे आणि नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो रुपयांचा भेसळयुक्त आणि घातक साठा अन् प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे. (राज्यात गुटखाबंदी असतांना प्रतिबंधित गुटखा येतोच कसा ? याची पाळेमुळे खणून ती नष्ट का केली जात नाहीत ? - संपादक)

प्रामुख्याने गुटखा, पानमसाला अन् तत्सम आरोग्याला घातक असलेल्या प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या प्रकरणी एकूण ५३ आस्थापनांची कसून पडताळणी करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी एकूण २५ प्रथम माहिती अहवाल नोंदवले. गुटख्याची अवैध वाहतूक करणारी ५ वाहने जप्त करण्यात आली असून २७ दुकानांना प्रशासनाने सील ठोकले. एकूण २० लाख ५७ सहस्र २९६ रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

धडक मोहिमेत सर्वाधिक मोठी कारवाई बृहन्मुंबई (मुंबई) विभागात झाली. मुंबईत एकूण १९ आस्थापनांची झाडाझडती घेण्यात आली. १९ आस्थापनांना तातडीने सील करण्यात आले आहे, तसेच कायद्याचे सर्रास उल्लंघन करणार्‍या १९ समाजकंटकांविरुद्ध गुन्हे नोंदवून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

गुटखा आणि पानमसाल्याव्यतिरिक्त अधिकार्‍यांनी २३ मोठ्या आस्थापनांची कसून पडताळणी केली. यामध्ये नागरिकांच्या दैनंदिन खाण्यापिण्याशी संबंधित असलेल्या पिशवीबंद पिण्याचे पाणी, दूध, नूडल्स, कार्बोनेटेड वॉटर, खाद्यतेल, स्वीट अन् फरसाण, आईस्क्रीम, ताडी, डिंक, मसाले, खवा, पनीर, तूप, बेसन आणि बेकरी पदार्थांच्या शुद्धतेची पडताळणी करण्यात आली.

कारवाईत २८ लाख ७८ सहस्र ५७२ रुपये किमतीचा संशयास्पद आणि नियमबाह्य अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. हे सर्व अन्नपदार्थ अत्यंत असुरक्षित आणि अस्वच्छ उत्पादन प्रक्रियेद्वारे सिद्ध केले जात होते. जप्त केलेल्या सर्व अन्नाचे नमुने पुढील विश्लेषणासाठी आणि प्रयोगशाळेच्या चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi