Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मुरगाव बंदरात महाकाय कॅसिनो नौका

मुरगाव बंदरात महाकाय कॅसिनो नौका

णजी, ६ मे (वार्ता.) - गेले अनेक दिवस वादाच्या केंद्रस्थानी असलेले ११२ मीटर लांबीची महाकाय कॅसिनो नौका ६ मे या दिवशी सकाळी मुरगाव बंदरात नांगरण्यात आली आहे. ही नौका लवकरच मांडवी नदीत वेरेच्या बाजूने येणार असल्याची चर्चा रंगू लागल्याने स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

मांडवी नदीमध्ये जुन्या ७० प्रवासी क्षमतेच्या कॅसिनो नौकांच्या जागी २ सहस्र प्रवासी क्षमतेची नवीन कॅसिनो नौका आणण्यास 'कॅप्टन ऑफ पोर्ट्स'ने यापूर्वीच संमती दिली आहे. 'कॅप्टन ऑफ पोर्ट्स'च्या या निर्णयाला 'इनफ इज इनफ' आणि 'पणजीकर अगेन्स्ट कॅसिनो' या संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात आव्हान दिले आहे आणि या प्रकरणी न्यायालयात सुनावणी चालू झाली आहे.

सध्या ही प्रचंड नौका मुरगाव बंदरातील बर्थ क्रमांक ४ वर नांगरण्यात येणार आहे आणि पावसाळा चालू होईपर्यंत म्हणजे पुढील एक मास ती 'शिपिंग एजंट'च्या देखरेखीखाली तेथेच ठेवली जाणार आहे. या कालावधीत नौकेची देखभाल, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि समुद्रातील चाचण्या घेऊन नौकेची समुद्रसक्षमतेची पडताळणी केली जाणार आहे.

कॅसिनो नौकेला विरोध

मांडवी नदीत महाकाय कॅसिनो नौका येऊ नये, यासाठी 'पणजीकर अगेन्स्ट कॅसिनो' ही संघटना गेल्या अनेक महिन्यांंपासून प्रयत्नशील आहे. यासंबंधी संघटनेने मुख्यमंत्री, नदी परिवहन मंत्री, 'कॅप्टन ऑफ पोर्ट्स' विभाग आणि इतर संबंधित अधिकारी यांना निवेदने दिली आहेत. या नौकेमुळे मांडवीचे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित होणार असल्याचा संघटनेचा आरोप आहे. यापूर्वी वेरे परिसरातील नागरिकांनी, 'महाकाय कॅसिनो नौकेला बेती-वेरे भागात येऊ देणार नाही', अशी ठाम भूमिका घेतली होती. यामुळे ती मांडवी नदीत आल्यास व्यापक आंदोलन छेडले जाण्याची शक्यता आहे. सध्या मांडवी नदीत चालू असलेल्या कॅसिनोंच्या विरोधातही मोठ्या प्रमाणात नापसंती व्यक्त केली जात आहे. या कॅसिनो नौकांमुळे पणजी शहरातील वाहतूक कोंडी वाढत असल्याचा वारंवार आरोप केला जात आहे.

त्याचप्रमाणे कॅसिनो संस्कृतीमुळे गोव्याची पारंपरिक संस्कृती बाधित होत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

न्यायालयाच्या अनुमतीविना नौका मांडवीत येणार नाही ! - कॅसिनो आस्थापनाचे आश्‍वासन

न्यायालयाच्या अनुमतीविना नवीन नौका मांडवी नदीत आणली जाणार नाही, असे स्पष्ट आश्‍वासन संबंधित कॅसिनो आस्थापनाने उच्च न्यायालयाच्या खंडपिठासमोर दिले आहे. खंडपिठाने सुनावणीच्या वेळी निरीक्षण नोंदवताना म्हटले, ''संबंधित कॅसिनो नौकेकडे आवश्यक त्या सर्व अनुज्ञप्ती अद्याप उपलब्ध नाहीत.'' यावर कॅसिनो आस्थापन न्यायालयाला हमी देतांना म्हणाले, ''संबंधित प्राधिकरणाकडून आवश्यक असलेली सर्व संमती, परवाने आणि प्रमाणपत्रे प्राप्त झाल्याविना, तसेच न्यायालयाची अनुमती मिळाल्याविना ही नौका मांडवी नदीत आणली जाणार नाही.'' न्यायालयाला गोवा सरकारने सांगितले की, जुन्या कॅसिनो नौकेची अनुज्ञप्ती नवीन महाकाय नौकेसाठी हस्तांतरित करण्याचा निर्णय घ्यायचे सरकारने ठरवले, तर संबंधित निर्णय प्रथम न्यायालयासमोर ठेवला जाणार आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी ६ जुलै या दिवशी होणार आहे.

महाकाय कॅसिनो नौका मांडवीत येणार नाही ! - केदार नाईक, आमदार

या प्रकरणी साळगावचे आमदार केदार नाईक म्हणाले, ''संबंधित महाकाय कॅसिनो नौका वेरे परिसरात येणार नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आम्हाला यासंबंधी स्पष्ट आश्‍वासन दिलेले आहे. यामुळे वेरेवासियांनी कोणतीही चिंता करण्याची आवश्यकता नाही.''

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi