नवी देहली - येथील काँग्रेस मुख्यालयाबाहेर मुसलमान महिलांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात आंदोलन केले. राहुल गांधी यांनी पुणे येथे आयोजित एका कार्यक्रमात 'पितृसत्तात्मक विचारसरणी' संपवण्याविषयी केलेल्या विधानानंतर हे आंदोलन करण्यात आले.
आंदोलक मुसलमान महिलांनी प्रश्न विचारला की, केंद्र सरकारने तीन तलाकविरुद्ध कायदा आणला, तेव्हा काँग्रेसने त्याला विरोध का केला ? तीन तलाक कायदा लागू झाल्यानंतर आम्ही अधिक सुरक्षित अनुभवत असल्याचे महिलांनी म्हटले. या महिलांनी राहुल गांधी यांना विचारले की, कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असतांना मंत्रीमंडळात एकही महिला मंत्री का नाही ? राहुल गांधी एकीकडे महिला सक्षमीकरणाच्या आणि पितृसत्ता मोडून काढण्याच्या गप्पा मारतात; पण प्रत्यक्षात मुसलमान महिलांच्या हक्कांच्या वेळी किंवा राजकीय प्रतिनिधित्वात काँग्रेसची भूमिका वेगळी असते, असा आरोप आंदोलकांनी केला.
राहुल गांधी केवळ एका विशिष्ट समुदायातील प्रथांवर बोलतात; परंतु शरीयत किंवा तीन तलाक यांसारख्या सूत्रांवर मौन बाळगतात, असा आरोप भाजपने केला आहे. काँग्रेस पक्षाने स्पष्ट केले आहे की, राहुल गांधी यांच्या विधानाचा उद्देश महिलांना स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देणे आणि त्यांच्यावर लादल्या जाणार्या सामाजिक बंधनांविरुद्ध बोलणे हा होता.

