म्युटेशन - भूमी मालकी हक्क हस्तांतर
मडगाव, २३ ऑक्टोबर (वार्ता.) - दक्षिण गोवा जिल्हाधिकार्यांच्या आदेशानंतर अनेक महिने प्रलंबित असलेली म्युटेशनची २१० प्रकरणे एका दिवसात निकाली काढली गेली आहेत.
या प्रकारामुळे 'म्युटेशन' प्रक्रियेत मोठा घोळ होता, हे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी घोळ झालेला असूनही, तसेच मुख्यमंत्र्यांनी याविषयी दोषींवर कारवाई करण्याची चेतावणी देऊनही अद्याप दोषींवर कारवाई झालेली नाही. लोकांना चांगली सेवा मिळण्यासह 'म्युटेशन' प्रक्रिया सुरळीत व्हावी आणि दोषींवर कारवाई व्हावी, यासाठी दक्षिण गोवा जिल्हा अधिवक्ता संघटनेच्या वतीने ही चळवळ अधिक व्यापक केली जाणार आहे, अशी माहिती संघटनेच्या पदाधिकार्यांनी दिली आहे. अधिवक्ता संघटना यासंबंधी पुन्हा जिल्हाधिकार्यांना भेटून मागण्या मांडणार आहेत.

मडगाव येथे दक्षिण गोवा जिल्हा अधिवक्ता संघटनेकडून विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना संघटनेचे अध्यक्ष तथा अधिवक्ता आंतानिओ क्लोविस दा कोस्ता म्हणाले, ''संघटनेने 'म्युटेशन' प्रक्रियेतील विलंबाविषयी जिल्हाधिकार्यांची भेट घेत समस्या मांडल्या होत्या. जिल्हाधिकार्यांनी संघटनेच्या तक्रारीनुसार दोषींवर कारवाई करण्याचे आणि नियमावली सिद्ध करण्याचे आश्वासन दिले होते; मात्र याला १० दिवस उलटूनही अद्याप नियमावली सिद्ध करण्यात आलेली नाही.''

