'१३ आणि १४ डिसेंबर २०२५ या कालावधीत नवी देहली (इंद्रप्रस्थ) येथे 'सनातन राष्ट्र शंखनाद' महोत्सव झाला. या महोत्सवातील पहिल्या दिवशी दुपारी आणि सायंकाळी झालेल्या सत्रांचे सूक्ष्म परीक्षण येथे दिले आहे.
'स्वराज्य संवाद' या सत्रात मान्यवर वक्त्यांनी 'छत्रपती शिवाजी महाराज यांची दृष्टी आणि वर्तमान भारत' याविषयी धर्मप्रेमींना दिशादर्शन केले.
१ अ. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी अनमोल मार्गदर्शन करणे : सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेमागील छत्रपती शिवाजी महाराज यांची विचारप्रणाली आणि उद्देश अत्यंत सोप्या भाषेत सुस्पष्ट केला. त्यांनी अत्यंत प्रभावीपणे उदाहरणे देऊन धर्मसत्ता आणि राज्यसत्ता यांचा परस्परांशी असणारा संबंध विशद केला. त्यांनी 'छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य हे भौतिक विकासासह आध्यात्मिक उन्नती करून देणारे रामराज्याचे प्रतिरूप असणारे आदर्श राज्य होते', याविषयी कार्यक्रमस्थळी स्थुलातून उपस्थित असणार्या धर्मप्रेमींना वैखरी वाणीतून आणि सूक्ष्मातून उपस्थित असणार्या धर्मविरांना पश्यंती वाणीतून मार्गदर्शन केले.
१ आ. 'सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाऊंडेशन'चे संस्थापक आणि माजी केंद्रीय सूचना आयुक्त श्री. उदय माहुरकर यांनी सांगितले, ''मला स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांकडून संस्कृती रक्षणाची प्रेरणा मिळते.'' यातून त्यांच्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतीचा आदरभाव आणि संस्कृती रक्षणाची तीव्र तळमळ जाणवली.
१ इ.पत्रकार स्मृती रस्तोगी यांनी अत्यंत कुशलतेने या परिसंवादाचे संचालन करणे : स्मृती रस्तोगी या अत्यंत चांगल्या हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी पत्रकार आहेत. त्यांनी अत्यंत कुशलतेने या परिसंवादाचे संचालन केले. यातून त्यांच्यामधील 'सात्त्विक बुद्धीमत्ता, अभ्यासू वृत्ती, उत्तम निर्णयक्षमता, विनम्रता' आदी गुण प्रकर्षाने जाणवले.
'सनातन संस्कृतीचे रक्षण' या सत्रात हिंदुत्वनिष्ठ वक्त्यांनी धर्मप्रेमींचे 'भारतातील सनातन धर्माच्या संस्कृतीचे रक्षण कशा प्रकारे करायचे ?', याविषयी धर्मप्रेमींचे प्रबोधन केले.
२ अ. अरुणाचल प्रदेशच्या बालसंसाधन आणि विकास संस्थेचे उपाध्यक्ष कुरु थाई यांनी तेथे केलेल्या हिंदुत्वाच्या रक्षणाच्या कार्यातील अनुभवकथन करणे : श्री. कुरु थाई यांच्यामध्ये 'समष्टी भाव, व्यापकत्व, क्षात्रभाव, नेतृत्वगुण, संघटन कौशल्य आणि प्रखर धर्मप्रेम' असे विविध गुण आहेत. ते अरुणाचल प्रदेश येथे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हिंदूंचे संघटन करत आहेत आणि हिंदूंचे ख्रिस्ती मिशनरी करत असलेल्या धर्मांतरासारख्या विविध संकटांपासून रक्षण करत आहेत.
२ आ. छत्तीसगडमधील भाजप नेते प्रबल प्रतापसिंह जुदेव यांनी धर्मांतरित हिंदूंना स्वधर्मात आणण्यासाठी केलेले महत्त्वपूर्ण कार्य : श्री. प्रबल प्रतापसिंह जुदेव यांच्यामध्ये धर्माप्रती पुष्कळ अभिमान आहे, तसेच त्यांच्यामध्ये 'व्यापकत्व आणि नेतृत्वगुण' आहे. ते छत्तीसगड राज्यात ख्रिस्ती मिशनर्यांनी धर्मांतर केलेल्या हिंदूंना पुन्हा हिंदु धर्मात प्रवेश करून देण्याचे, तसेच हिंदूंचे संघटन करण्याचे प्रभावी कार्य करतात.
२ इ. 'प्राच्यम् ओटीटी'चे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅप्टन प्रवीण चतुर्वेदी (निवृत्त) यांनी ते 'डिजिटल मिडिया'च्या माध्यमातून करत असलेल्या 'भारतीय गौरवशाली इतिहास आणि संस्कृती' यांच्या रक्षणाच्या कार्याविषयी सांगणे : कॅप्टन प्रवीण चतुर्वेदी (निवृत्त) यांच्या मनावर धार्मिक संस्कार प्रबळ असल्यामुळे ते हॉलीवूड (अमेरिकेतील चित्रपटसृष्टी) येथील कार्याचा त्याग करून भारतात आले आणि त्यांनी भारतीय संस्कृतीच्या संरक्षणाचे कार्य डिजिटल मिडियाद्वारे चालू केले. त्यामुळे भारतीय संस्कृतीचे सुंदर आणि सात्त्विक स्वरूप संपूर्ण जगाला समजण्यास सोपे जात आहे अन् अनेक विदेशी लोक 'भारतीय संस्कृती आणि शौर्यपूर्ण इतिहास' यांविषयी जाणून प्रभावित होत आहेत.
२ ई. 'सुदर्शन' वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक डॉ. सुरेश चव्हाणके यांनी संवाद सत्राचे प्रभावी संचालन करणे : 'सुदर्शन' वृत्तवाहिनीचे संपादक डॉ. सुरेश चव्हाणके यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण आणि वक्त्यांच्या विचारांमध्ये समन्वय करून प्रभावीपणे या सत्राचे संचालन केले. त्यांच्यामध्ये उत्तम वक्तृत्वकला आहे. त्यांनी सर्वांना केवळ चर्चेत सहभागी करून न घेता प्रत्यक्ष कृतीच्या स्तरावर 'हिंदुत्वरक्षण आणि हिंदुत्वाचा प्रसार' हे कार्य करण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांच्या प्रभावी सूत्रसंचालनामुळे श्रोते आणि धर्मप्रेमी हिंदू यांच्यामध्ये धर्माभिमानाचा संचार होऊन धर्मतेजाची लाट सळसळली.
श्री. संजय सेठ यांनी राष्ट्रावरील आतंकवादी आक्रमणांविषयी सांगून धर्मप्रेमींमध्ये जागृती केली. त्यांनी राष्ट्ररक्षणासाठी प्राणांचे बलीदान केलेल्या सैनिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यातून त्यांच्यामधील 'प्रखर राष्ट्रप्रेम, अपार राष्ट्रीय अस्मिता आणि कृतज्ञताभाव' जाणवले.
या सत्रामध्ये मंदिरांच्या संरक्षणासाठी कृतीप्रवण असलेल्या मान्यवर वक्त्यांनी धर्मप्रेमींना यथोचित मार्गदर्शन केले.
४ अ. तंजावूर येथील वेदप्रचाररत्न वेदकुलपति जी.के. सीतारामन् यांनी मंदिरांच्या रक्षणाविषयी भावपूर्णरित्या मार्गदर्शन करणे : तमिळनाडू येथील अग्निहोत्री जी.के. सीतारामन् यांच्या कुळाने प्राणावरील संकटाची पर्वा न करता सलग १ सहस्र वर्षे सोमनाथ येथील शिवलिंगाच्या भग्न अवशेषांचे, म्हणजे सोमलिंगाचे संरक्षण आणि जतन केले. यातून त्यांच्यामधील 'धर्मरक्षणाची तीव्र तळमळ, धर्मरक्षणासाठी सर्वस्वाचा त्याग करण्याची सिद्धता, धर्माप्रती अपार भाव, अतूट श्रद्धा आणि कर्तेपणा त्यागून झालेल्या अहंशून्य अवस्थेतील विनम्रभाव अन् समर्पणभाव' हे गुण शिकायला मिळाले. त्यांच्या मुखावर निखळ आनंद आणि भगवान शिवाप्रतीचा बालकभाव जाणवत होता. त्यांच्यामध्ये सर्व हिंदूंना 'सोमलिंगाचे दर्शन घडवण्याची व्यापक तळमळ आणि सेवाभावी वृत्ती' जाणवली.
४ आ. सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ अधिवक्ता श्रीधर पोतराजू यांनी केलेला प्रबोधनात्मक संवाद : वरिष्ठ अधिवक्ता श्रीधर पोतराजू यांच्यामध्ये प्रभु श्रीरामाप्रतीचा नितांत सेवाभाव आणि शरणागतभाव जाणवतो. त्याचप्रमाणे त्यांच्यामध्ये अयोध्येतील प्रभु श्रीरामाच्या मंदिराप्रमाणे अन्य मंदिरांच्याही संरक्षणासाठी न्यायालयीन लढा देऊन लढाऊ वृत्तीने मंदिरांचे संरक्षण करण्याची तीव्र तळमळ जाणवते.
४ इ. श्रीराम सेनेचे संस्थापक प्रमोद मुतालिक यांनी चिक्कमगळूर येथील मुसलमानांनी नियंत्रणात घेतलेल्या दत्तपिठाच्या पुनर्प्राप्तीसाठी दिलेला लढ्याचा वृत्तांत संक्षिप्तपणे सांगणे : श्री. प्रमोद मुतालिक यांच्यामध्ये प्रभु श्रीरामाप्रती नितांत श्रद्धा, अपार समर्पणभाव आणि क्षात्रभावही जाणवला. त्याचप्रमाणे त्यांच्यामध्ये हिंदूंचे संघटन करून विपरीत स्थितीतही धर्मरक्षण करण्याची आणि धर्मविरोधी शक्तींशी सातत्याने अन् चिकाटीने मारक भावाने झुंजण्याची आणि निर्भीडपणे सातत्याने लढण्याची दैवी क्षमता असल्याचे जाणवले. यातून त्यांच्यातील जाज्वल्य धर्माभिमानाची प्रचीती येते.
४ ई. वरिष्ठ पत्रकार आणि वृत्तनिवेदिका श्वेता त्रिपाठी यांनी या परिसंवादाचे भावपूर्णरित्या संचालन केले.
स्मरण करूया त्या रणरागिणींचे ।।
देशासाठी प्राणार्पण करणार्या माताभगिनींचे ।
कृतज्ञता व्यक्त करते रणचंडीमातेचे ।
धर्मपुत्रांचे रक्षण करणार्या देवीमातेचे' ।।
(क्रमशः)
- सुश्री मधुरा भोसले (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्ती साधिका, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : १३.१२.२०२५, वेळ : दुपारी २.३० ते सायंकाळी ७ आणि कालावधी : ४ घंटे ३० मिनिटे)

