Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नवी मुंबई आर्.टी.ओ.ची १६२ खासगी बसगाड्यांवर कारवाई !

नवी मुंबई आर्.टी.ओ.ची १६२ खासगी बसगाड्यांवर कारवाई !

वी मुंबई - वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या १६२ खासगी प्रवासी वाहतूक बसगाड्यांवर नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांनी कारवाई केली आहे. यामध्ये ४ लाख २६ सहस्र रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दत्तात्रेय सांगोलकर यांनी दिली.

शहरामध्ये अनेक ठिकाणी खासगी प्रवासी वाहतूक करणार्‍या बसगाड्या मध्येच रस्त्यात थांबून प्रवासांची चढ-उतार करत असतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. परिवहनमंत्र्यांकडे राज्यातील मुख्य शहरांमध्ये असे प्रकार होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर परिवहनमंत्र्यांनी या प्रकरणी कारवाईचे आदेश दिले होते.

नवी मुंबईतही वाशी, सानपाडा, जुईनगर, नेरूळ आणि सीबीडी या उड्डाणपुलांच्या जवळ, तसेच एस्.टी. महामंडळाच्या बसथांब्यावर खासगी बसगाड्या प्रवासी भरण्यासाठी उभ्या असतात. त्यामुळे या ठिकाणी अनेकदा वाहतुकीची कोंडी होते.

या प्रकरणी नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, तसेच त्यानुसार १ एप्रिलपासून नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांकडून अशा प्रकारे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर खासगी प्रवासी वाहतूक करणार्‍या बसगाड्यांवर धडक कारवाईची मोहीम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये १ एप्रिलपासून अद्यापपर्यंत १६२ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.

यापुढेही ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबवण्यात येणार असून खासगी प्रवासी वाहतूकदारानी वाहतूक नियमांचे पालन करावे, तसेच एस्.टी. महामंडळाच्या बस थांब्यालगत २०० मीटरपर्यंत प्रवासी चढ-उतार करू नये, असे आवाहन दत्तात्रेय सांगोलकर यांनी केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi