नवी मुंबई - 'एअर इंडिया' विमान आस्थापनाने उच्च दर, अपुरी संपर्कयंत्रणा आणि दुहेरी विमानतळ संचालन (वाहतूक) यांमुळे वाढत्या खर्चाचे कारण देत नवी मुंबई विमानतळावर वाहतूक चालू करण्यास भारतीय विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरणाकडे असमर्थता दर्शवली आहे.
सध्याच्या परिस्थितीत नवी मुंबई विमानतळावरून विमान वाहतूक चालू करणे आर्थिकदृष्ट्या लाभदायी नसल्याचे मत 'एअर इंडिया' विमान आस्थापनाने व्यक्त केले आहे.
माजी वैमानिक कॅप्टन अभिजित अडसूळ म्हणाले,
१. मुंबई आणि नवी मुंबई विमानतळांवरून एकाच वेळी अनेक विमाने चालवल्यास मनुष्यबळासह अन्यही गरजा दुप्पट वाढतील. त्यातून खर्च वाढेल.
२. नवी मुंबई विमानतळावर विमान उतरवण्याचा खर्च नोएडा विमानतळाच्या तुलनेत देशांतर्गतसाठी ८४ टक्के आणि आंतरराष्ट्रीयसाठी ११३ टक्के अधिक असू शकतो.
३. नवी मुंबई विमानतळापर्यंत प्रवाशांसाठी योग्य मेट्रो किंवा रस्ते यंत्रणा उपलब्ध नसल्याने बहुतांश प्रवासी मुंबई विमानतळालाच प्राधान्य देतात. विशेषतः पश्चिम मुंबईतील प्रवाशांना नवी मुंबईत पोचणे अवघड होते.
४. मुंबई विमानतळावरील टर्मिनल १ बंद करण्याविषयी स्पष्टता नसल्याने नवी मुंबई विमानतळावरून वाहतूक चालू ठेवणे कठीण आहे.
५. वैमानिक, हवाई सुंदरी, तसेच अन्य कर्मचारी मोठ्या संख्येने पश्चिम उपनगरांत रहातात. वैमानिकांना देशांतर्गत विमानासाठी किमान १ घंटा आणि आंतरराष्ट्रीय विमानासाठी दीड घंटा आधी विमानतळावर उपस्थित रहावे लागते. हवाई सुंदरींना २ घंटे आधी यावे लागते. जोपर्यत नवी मुंबई विमानतळापर्यंत पोचण्यासाठी सक्षम वाहतूक व्यवस्था निर्माण होत नाही, तोपर्यत विमान आस्थापने येथून विमान सेवा चालवण्यास टाळाटाळ करतील.
एअर इंडिया एक्स्प्रेस, इंडिगो, स्टार एअर आणि अकासा एअर या आस्थापनांची विमाने बेंगळुरू, देहली, गोवा-मोपा, कोच्चि, अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, कोइंबतूर, भाग्यनगर, जयपूर, लक्ष्मणपुरी (लखनौ), मंगळुरू, नागपूर आणि वडोदरा या ठिकाणी प्रवास करत आहेत.

