नागपूर - सीमेपलीकडून भारतात होणार्या अवैध कृत्यांची साखळी आता थेट बाजारपेठांपर्यंत पोचली आहे. नागपूरमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाने एका व्यापारी प्रतिष्ठानावर धाड घालून पाकिस्तानातून अनधिकृतपणे आयात केलेल्या सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त केला आहे.
'मेड इन पाकिस्तान' असे लिहिलेली ही उत्पादने मुंबईमार्गे नागपूरमध्ये आणली गेल्याचा दाट संशय आहे.
इतवारी परिसरातील कासारपुरा गल्ली येथील 'मे. साईबाबा ट्रेडर्स' या दुकानावर पथकाने धाड घातली. जप्त केलेल्या साठ्यामध्ये 'गोरी ब्युटी क्रीम', 'फेस फ्रेश गोल्ड प्लस', 'गोल्डन स्टार ब्युटी क्रीम', 'गोरी व्हाइटनिंग बॉडी लोशन' आणि 'गोरी व्हाइटनिंग सोप' यांसारख्या पाकिस्तानी बनावटीच्या उत्पादनांचा समावेश आहे. या मालाची किंमत अनुमाने १५ सहस्र १८६ रुपये आहे. या उत्पादनांवर आयात नोंदणी क्रमांक, उत्पादन परवाना, घटकांची माहिती, निर्मितीचा दिनांक किंवा कालबाह्यता दिनांक अशी कोणतीही अधिकृत माहिती नमूद नव्हती.
या उत्पादनांच्या खरेदीची कोणतीही अधिकृत देयके विक्रेत्याकडे आढळली नाहीत. या सौंदर्यप्रसाधनांमध्ये पारा आणि स्टिरॉइड्स यांसारखे मानवी आरोग्याला अत्यंत अपायकारक असणारे घटक असण्याची शक्यता अधिकार्यांनी वर्तवली आहे. या उत्पादनांचे नमुने पडताळणीसाठी मुंबई येथील शासकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणामागे आंतरराज्यीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे जाळे कार्यरत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी तहसील पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया चालू असून पुरवठा साखळीचे सखोल अन्वेषण केले जात आहे.

