पुणे - येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील वसतीगृहातील अनागोंदी कारभाराची पहाणी करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे आले होते. या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्राशेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र लावल्याचे निदर्शनास आल्यावर ठाकरे यांनी त्यावर तीव्र आक्षेप घेतला.
त्यानंतर ते छायाचित्र काढण्यात आले; परंतु विरोधानंतर ते पुन्हा लावले. भाजपचे नेते नवनाथ बन यांनी संताप व्यक्त करत, ''हा देशाच्या पंतप्रधानांचा अवमान असून ठाकरे यांच्यावर गुन्हा नोंदवावा'', अशी मागणी केली आहे.
नवनाथ बन यांनी सांगितले की, तिथे नरेंद्र मोदी म्हणून नाही, तर देशाचे पंतप्रधान म्हणून ते छायाचित्र लागले होते. सरकारी कार्यालयांमध्ये पंतप्रधानांचे छायाचित्र लावण्याची परंपरा नवीन नाही, काँग्रेसच्या काळातही असे छायाचित्र लावले जायचे. केवळ भाजपला लक्ष्य करून प्रसिद्धी मिळवण्याचा हा प्रयत्न असून अशा सूत्रांमुळे तुम्ही तोंडावर पडाल. नवनाथ बन यांच्या विधानावर 'माझ्यावर यापूर्वी झालेला पहिला गुन्हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठीच होता. आता महाराजांच्या सन्मानासाठी माझ्यावर दुसरा गुन्हा नोंद झाला, तरी मला चालेल', असे प्रत्युत्तर अमित ठाकरे यांनी दिले आहे. या प्रकरणी अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.
अमित ठाकरे पुण्यातील एकूण ७ महाविद्यालयांना भेटी देऊन 'जेन झी' (वर्ष १९९७ ते २०११ या कालावधीत जन्माला आलेली मुले) विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. या दौर्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी, समस्या, अपेक्षा आणि विविध प्रश्न जाणून घेतले जाणार आहेत.

