नवी देहली - जंतरमंतर येथे २३ जुलै या दिवशी झालेल्या आंदोलनाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य करणार्या १५ वर्षीय विद्यार्थिनीने एक व्हिडिओ प्रसारित करून हात जोडून क्षमा मागितली.
या व्हिडिओमध्ये ती म्हणाली, ''माझे वय १५ वर्षे आहे. मी कनॉट प्लेस येथे भेट दिल्यानंतर मित्रांसमवेत आंदोलनस्थळी गेले होते. तेथील वातावरण आणि उपस्थित लोकांच्या प्रभावामुळे मी आक्षेपार्ह वक्तव्य केले. माझ्याकडून मोठी चूक झाली. मी जे बोलले ते अक्षम्य आहे. देशाने मला क्षमा करावी. मला माझ्या कृत्याची लाज वाटते. ही माझी पहिली आणि शेवटची चूक आहे.''
तत्पूर्वी ३१ जुलैला रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इन्स्टाग्रामवर आंदोलनाच्या वेळी स्वतः आणि त्यांची दिवंगत आई यांच्याविरोधात करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांचा उल्लेख करत 'संबंधित विद्यार्थ्यांना क्षमा केली आहे. तरुणांना त्यांच्या चुका सुधारण्याची संधी मिळायला हवी', असे सांगितले.
सदर विद्यार्थिनीविरुद्ध नोएडातील एक्सप्रेसवे पोलीस ठाण्यात २९ जुलै या दिवशी शून्य प्रथमदर्शनी अहवाल नोंद (झीरो एफ्.आय.आर्.) (झीरो एफ्.आय.आर्. म्हणजे कोणत्याही पोलीस ठाण्यात नोंदवता येणारा प्राथमिक गुन्हा) नोंदवण्यात आला आहे. पंतप्रधानपदासारख्या घटनात्मक पदाचा अपमान केल्याचा आणि समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तिच्यावर आहे. त्यानंतर हा गुन्हा पुढील अन्वेषणासाठी देहलीतील पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला.
देहलीतील आंदोलनाचे आयोजन करणार्या 'कॉकरोच जनता पक्षा'चे प्रवक्ते सौरभ दास म्हणाले, ''आक्षेपार्ह भाषेचे समर्थन करता येणार नाही. तथापि अशा प्रकरणांत फौजदारी कारवाईऐवजी मानहानीचा दावा अधिक योग्य ठरू शकतो. अशा गुन्ह्यांमुळे अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर प्रतिकूल परिणाम होतो.''

