पिंपरी (पुणे) - फौजदारी गुन्हा, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई, कामकाजात हयगय, निष्काळजीपणा, कर्तव्यात कसूर, प्रशासकीय कामकाजातील गोपनीयतेचा भंग करणे या कारणांमुळे ७ महिन्यांत पिंपरी-चिंचवड महापालिकेतील ११ अधिकारी आणि कर्मचारी यांना निलंबित करण्यात आले आहे.
कर्मचार्यांकडून गंभीर चूक होताच आयुक्त विजय सूर्यवंशी थेट निलंबन करत आहेत. (निलंबित केलेले अधिकारी किंवा कर्मचारी या ना त्या मार्गाने पुन्हा सेवेत रुजू होतात. त्यामुळे आयुक्तांनी अधिकारी आणि कर्मचारी यांना बडतर्फ करायला हवे ! - संपादक)
कामकाजात हयगय आणि निष्काळजीपणा, कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी स्थापत्य अभियांत्रिकी साहाय्यक शेषेराव अटकोरे, प्रशासकीय कामकाजातील गोपनीयतेचा भंग केला म्हणून कनिष्ठ अभियंता संदीप हजारे, तर फौजदारी गुन्हा नोंद झाल्याच्या प्रकरणी अभिजित गायकवाड यांचे निलंबन करण्यात आले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईमुळे स्थापत्य अभियांत्रिकी साहाय्यक उमेश लोंढे यांचे १५ जून या दिवशी, मोशी कचरा डेपोतील दुर्घटनेप्रकरणी मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांचे १५ जुलै या दिवशी, अग्नीशमन केंद्र अधिकारी ऋषिकांत चिपाडे यांचे १८ जुलै या दिवशी निलंबन झाले. महिला शिक्षिकेची छेड काढल्यामुळे अनुरेखक दिलीप आडे ८ सप्टेंबर या दिवशी, तर ११ सप्टेंबरला कामकाजातील अनियमितता केल्याप्रकरणी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विजय सोनवणे, उपअभियंता अशोक मोरे आणि वैद्यकीय सेवेत मद्यप्राशन केल्याप्रकरणी आधुनिक वैद्य वैभव म्हस्के यांचे १६ ऑक्टोबर या दिवशी निलंबन झाले.

