पुणे - शहरात विषारी मद्यप्राशन करून २४ घंट्यांमध्ये १५ जणांचा मृत्यू झाला. पिंपरी-चिंचवडमधील दापोडी, फुगेवाडी आणि पिंपळे गुरव परिसरातील ९ जण, हडपसर भागातील ६ जणांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्यांमध्ये कामगार आणि सर्वसामान्य नागरिक यांचा समावेश आहे.
विषारी मद्य सिद्ध करणारा आरोपी योगेश वानखेडे यांच्यासह ८ जणांना पोलिसांनी अटक केली. वानखेडे याच्या विरोधात यापूर्वीही ३ गुन्हे नोंद असल्याची माहिती मिळते.
१. या प्रकरणातील मुख्य आरोपी वानखेडे याने मुंबईहून 'मिथेनॉल' आणून ते मद्यात अधिक प्रमाणात मिसळून विषारी मद्य सिद्ध केले. त्याने सिद्ध केलेले मद्य दापोडी, हडपसर आणि चतुश्रृंगी परिसरातील ४ विक्रेत्यांना दिले होते. अधिक लाभ मिळवण्याच्या उद्देशाने योगेश वानखेडे याने मद्यामध्ये मिथेनॉल मिसळले होते.
२. या प्रकरणातील आरोपी कर्नलसिंग विरका, त्याची पत्नी इंदरजित विरका आणि मुलगा गुरुचरण विरका यांना पोलिसांनी अटक केली. हे घरातूनच मद्यविक्री करत होते.
३. राज्य उत्पादन शुल्क विभागाने या प्रकरणात स्वतंत्र गुन्हे नोंद केले आहेत. पोलीस आणि उत्पादन शुल्क विभाग एकत्रितपणे या घटनेचे अन्वेषण करत आहेत.
ही केवळ अपघाताची घटना नाही, तर हत्या आहे. ज्यांनी हे विषारी मद्य सिद्ध केले, त्याच्यामागे कोण आहे ? याचे अन्वेषण करा. कुणाचीही गय करू नका. कठोर कारवाई करा, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलिसांना दिले आहेत.
शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांसह संबंधित विषारी मद्याच्या अड्ड्यावर धाव घेतली. पवार यांनी तेथील लाकडी साहित्य फोडले. कार्यकर्त्यांनी पत्रे उखडून संपूर्ण अड्डा उद्ध्वस्त केला. 'या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला स्वत:हून शरण येण्यास सांगितले. जेणेकरून मुख्य सूत्रधार म्हणजे 'मोठा मासा' यातून सुटू शकेल', असा आरोपही रोहित पवार यांनी या वेळी केला.
स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, पोलिसांना या मद्यविक्रीची सर्व माहिती होती. तरीही त्यांनी वेळीच कारवाई केली नाही. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप आणि भीती आहे. (माहिती असूनही पोलीस मद्यविक्रीच्या ठिकाणी कारवाई करत नाहीत, म्हणजे त्यांना हप्ते मिळत आहेत, असा अर्थ सामान्य नागरिकांनी घेतल्यास चुकीचे ते काय ? संबंधित पोलिसांवर कारवाई होणे आवश्यक ! - संपादक)

