पुणे - पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामध्ये रिक्शा प्रवास १ सप्टेंबरपासून महागणार आहे. 'प्रादेशिक परिवहन प्राधिकरणा'ने (आर्.टी.ओ.) रिक्शा भाड्यांमध्ये वाढ करण्यास अधिकृत मान्यता दिली आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
नव्या दरानुसार पहिल्या दीड कि.मी. प्रवासासाठी २५ रुपयांऐवजी ३० रुपये द्यावे लागणार. त्यानंतरच्या प्रत्येक कि.मी. प्रवासासाठी १७ रुपये आकारले जात होते, ते आता २० रुपये केले आहेत. गेल्या काही काळापासून इंधनाचे मूल्य वाढत असल्याने आणि रिक्शांच्या देखभालीचा व्यय अधिक होत असल्यामुळे 'रिक्शाचालक संघटनां'कडून भाडेवाढीची मागणी केली जात होती. १ सप्टेंबरपासून या नवीन दराची दोन्ही शहरांमध्ये कार्यवाही चालू होणार आहे. प्रवाशांनी रिक्शामध्ये बसतांना नवीन दराची माहिती घेऊन प्रवास करावा, असे प्रशासनाने सूचित केले आहे.

