पुणे - शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये कार्यरत असलेल्या मुसलमान पोलिसांना नमाजपठणासाठी एक छोटी जागा देण्यात आली होती; परंतु त्या जागेच्या सभोवतालच्या १० गुंठे शासकीय भूमीवर अतिक्रमण करून एक मोठी पंचतारांकित मशीद बांधण्यात आली आहे.
या संवेदनशील परिसरातून देशविघातक कृत्ये आणि सुरक्षा यांना धोका असल्याचा गंभीर आरोप मानद पशूकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांनी फेसबूकवर व्हिडिओ पोस्ट करून केला. या अनधिकृत मशिदीवर तातडीने कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
१. बाहेरील ४०० ते ५०० जणांचा राबता आणि विद्यार्थिनींची छेडछाड !
या मशिदीत केवळ पोलीसदलातील मुसलमान कर्मचार्यांना नमाजपठणाची अनुमती असतांना प्रत्यक्षात पुणे कँप, कोंढवा, खडकी, दापोडी यांसारख्या भागांतून प्रतिदिन ४०० ते ५०० जण नमाजपठणासाठी येतात. यामुळे डीसीपी बंगल्याच्या परिसरात अनधिकृत वाहने उभी करणे वाढले असून मशिदीसमोरील मॉडर्न महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या छेडछाडीचे प्रकार घडत आहेत, ज्यामुळे स्थानिक पोलीस कुटुंबांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. (जे एका मानद पशूकल्याण अधिकार्याला कळते, ते पोलिसांना का कळत नाही ? - संपादक)
२. आतंकवादविरोधी पथकाच्या कार्यालयावर छायाचित्रकाद्वारे पाळत ?
बाहेरील राज्यातील २ वादग्रस्त मौलवी (इस्लामचा धार्मिक नेता) येथे अवैधपणे वास्तव्यास असून ते भडकावू भाषणे करतात आणि रात्रीच्या वेळी संशयित लोकांच्या बैठका येथे पार पडतात, असाही आरोप करण्यात आला आहे. (कोणत्या बैठका पार पडतात ?, त्यात कोणकोण सहभागी असतात ?, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे ! - संपादक) कोथरूड परिसरात आतंकवादी पकडले गेले होते, तेव्हा मशिदीपासून अवघ्या २० मीटर अंतरावर असलेल्या आतंकवादविरोधी पथकाच्या कार्यालयावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी या धर्मांध पोलीस आणि मौलवी यांनी या मशिदीच्या मागच्या बाजूने कार्यालयाच्या बाजूला छायाचित्रक फिरवला होता, जो पोलिसांनी हटकल्यानंतर बाजूला करण्यात आला.
३. शासकीय जागा वक्फ बोर्डाच्या घशात !
पोलीसदलात कार्यरत असलेल्या काही धर्मांध पोलीस कर्मचार्यांनी बाहेरील संघटनांशी हातमिळवणी करून या शासकीय भूमीची नोंद वक्फ बोर्डामध्ये केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या गंभीर प्रकाराची कल्पना स्थानिक प्रशासनालाही नव्हती. या संदर्भात पोलीस आयुक्त आणि पोलीस महासंचालक यांच्याकडे लेखी तक्रार देऊन कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे; कारण यापूर्वी हे पोलीस मुख्यालय उडवून देण्याच्या धमक्याही आल्या होत्या.
४. दोषी पोलिसांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी !
शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये दारूगोळा कोठार, पोलीस मुख्यालय, ए.टी.एस्. कार्यालय आणि बाँबशोधक पथकाचे कार्यालय अशी महत्त्वाची कार्यालये असल्याने ही जागा सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील आहे. त्यामुळे अनधिकृतपणे बांधलेली ही मशीद हटवावी आणि या कटात सहभागी असलेल्या पोलिसांवर फौजदारी खटला प्रविष्ट (दाखल) करून त्यांचे निवृत्तीवेतन बंद करावे, अशी मागणी महाराष्ट्र पोलिसांकडे करण्यात आली आहे.

