आटपाडी (जिल्हा सांगली), ३० मे (वार्ता.) - लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र खरसुंडी येथील 'श्रीनाथ देव देवस्थान ट्रस्ट' या धार्मिक संस्थेला आणि तिच्या पारदर्शक कारभाराला अपकीर्त करण्याचा संघटित अन् कुटील प्रयत्न मागील ३ ते ४ महिन्यांपासून काही राजकीय व्यक्तींकडून चालू आहे.
वैयक्तिक द्वेष, राजकारण आणि आसंदीचा मोह यांमुळे देवस्थानावर खोटे, विनापुराव्याचे अन् भडक आरोप केले जात आहेत. या गदारोळातून स्थानिक पुजारी समाज आणि ट्रस्ट यांच्यात फूट पाडण्याचे पापही या मंडळींनी केले असून या प्रकारामुळे जाणकार भाविक आणि मंदिरप्रेमी जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. 'हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि मंदिरप्रेमी भाविकांनी वस्तूस्थिती समजून घेऊन या पवित्र तीर्थक्षेत्राचे पावित्र्य टिकवण्यासाठी पुढे यावे', अशी चर्चा परिसरात चालू आहे. (देवस्थानाच्या कारभारात अडचणी निर्माण करण्यासाठी राजकीय हेतूने प्रयत्न करणार्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. - संपादक)
'श्रीनाथ देवस्थान ट्रस्ट' ही एक स्वतंत्र संस्था असून वर्ष १९९४-९५ पासून ७ विश्वस्त या संस्थेचे कामकाज अत्यंत प्रामाणिकपणे पहात आहेत. संस्थेचे सर्व आर्थिक व्यवहार, वार्षिक लेखापरीक्षण आणि भाविकांनी अर्पण केलेल्या मौल्यवान वस्तूंचा हिशोब ट्रस्टच्या दप्तरी अन् धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे रीतसर नोंदवलेला आहे. वर्ष २०२५ पर्यंतचे सर्व लेखापरीक्षण पूर्ण झाले असून आजतागायत धर्मादाय कार्यालयाकडून ट्रस्टच्या कारभारावर कोणताही गंभीर दोषारोप झालेला नाही. भाविक आणि ट्रस्ट यांच्या उत्तम समन्वयातूनच सर्व यात्रा, उत्सव आणि परंपरेचे मानपान आजवर सुरळीतपणे पार पडले आहेत.
गावातील काही उपद्रवी मंडळींना मागील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता. हा राजकीय पराभव न पचल्याने केवळ सूडबुद्धीने ट्रस्टला अपकीर्त करण्याचे प्रयत्न चालू करण्यात आले आहेत. यासाठी एक विशिष्ट टोळी कार्यरत असून सामाजिक माध्यमे, वृत्तपत्रे आणि तोंडी प्रचाराच्या माध्यमांतून भाविक अन् नागरिक यांना संभ्रमित करणारी खोटी माहिती देऊन जनतेमध्ये अपसमज पसरवला जात आहे.
या उपद्रवी टोळीने जिल्ह्यातील काही आंदोलकांना हाताशी धरून सोने-चांदीविषयी खोटी आणि फुगवलेली आकडेवारी प्रसिद्ध केली, तसेच सांगली धर्मादाय आयुक्त अन् जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलने करून 'ट्रस्ट विसर्जित' करण्याची मागणी केली. ज्येष्ठ राजकीय नेत्यांच्या वजनाचा वापर करून धर्मादाय कार्यालयातील अधिकार्यांवर चहूबाजूंनी दबाव आणला जात आहे. या संपूर्ण प्रकरणात ट्रस्टने अनेकदा वस्तूस्थितीचे खुलासे देऊनही हेतूपुरस्सर कारवाया थांबवल्या जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
देवस्थानाची सर्व चांदी सुरक्षित असून वर्ष २०२५ पर्यंतचे लेखापरीक्षण पूर्ण असतांनाही केवळ ट्रस्टला 'लक्ष्य' केले जात आहे. यामागचा खरा हेतू 'कसाही करून हा पारदर्शक कारभार असलेला ट्रस्ट विसर्जित करायचा आणि तेथे स्वतःच्या राजकीय लोकांची वर्णी लावायची', हाच आहे. राजकीय स्वार्थासाठी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान अपकीर्त करणार्या या प्रवृत्तींविषयी आता श्रद्धाळू जनतेमध्ये प्रचंड अप्रसन्नता व्यक्त होत आहे.
भाविकांनी अर्पण केलेल्या चांदीविषयी जे गंभीर आरोप केले गेले, त्यात काहीही तथ्य नसून केवळ द्वेषाचे वातावरण निर्माण करण्यासाठी हे केले गेले. त्याची खरी वस्तूस्थिती खालीलप्रमाणे आहे…
मंदिराच्या गाभार्यातील २ अष्टकोनी खांबांवर वेजेगाव आणि देवीखिंडी येथील भाविकांनी अंदाजे २५ किलो चांदीच्या पत्र्याचे नक्षीकाम केले होते. हा पत्रा अत्यंत पातळ असल्याने कालांतराने त्याची झीज होऊन तुकडे निघू लागले होते. ते तुकडे भाविकांच्या हाताला लागून इजा होण्याची शक्यता असल्याने ट्रस्टने मासिक सभेचा रीतसर ठराव केला.
भाविक आणि ट्रस्ट यांच्या प्रतिनिधींच्या समक्ष रितसर पंचनामा करून ही चांदी दुरुस्तीसाठी कारागिराकडे देण्यात आली. या चांदीचे नक्षीकाम पुन्हा नव्या स्वरूपात करण्याचे काम कोल्हापूर येथे चालू आहे. संबंधित चांदी कारागिराकडे जमा असल्याचे जबाबही कारागिराने दिले आहेत.
असे असतांनाही 'विश्वस्तांनी चांदी लंपास केली', अशी अफवा या उपद्रवी लोकांनी उठवली. ट्रस्टने संबंधित भाविकांची समजूत काढली, तसेच त्यांना कोल्हापूर येथे समक्ष नेऊन चालू असलेले काम आणि चांदी दाखवली, तरीही राजकीय दबावाखाली त्यांनी आटपाडी पोलीस ठाणे, विटा उपविभागीय पोलीस अधिकारी आणि सांगली पोलीस प्रमुख यांच्याकडे खोट्या तक्रारी प्रविष्ट केल्या.
'श्री सिद्धनाथ मंदिरा'तील गाभार्यात २० ते २५ वर्षांपूर्वी २ अष्टकोनी खांबांवर अंदाजे २४ किलो चांदीचे नक्षीकाम देवीखिंडी आणि वेजेगाव येथील २ भाविकांनी अर्पण केले होते. आज अंततः या कामाविषयी कुणाची तक्रार नव्हती; मात्र ४ महिन्यांपूर्वी या पत्र्याची झीज झाल्याने तो दुरुस्त करण्याविषयी देवस्थान ट्रस्टने मासिक सभेत रीतसर ठराव केला. त्यानंतर तो पत्रा काढून दुरुस्तीसाठी देण्यात आला. तथापि येथे राजकीय द्वेषातून काही मंडळीनी 'पत्रा चोरीस गेला आणि ट्रस्टद्वारे तो गायब केला' असल्याच्या खोट्या बातम्या दिल्यामुळे देवीखिंडीच्या भाविकांनी ट्रस्टच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली.

