कोल्हापूर, ४ मे (वार्ता.) - भारतीय परंपरेत समर्पण ही एक श्रेष्ठ संकल्पना आहे. समाज जर नित्य जागृत राहिला, तर समाजाची अवनती निश्चित टाळता येते. याच आधारे राष्ट्रासाठी समर्पित होऊन कार्य करणारे 'व्यक्ती निर्माण', हे संघाचे कार्य आहे.
संघ आणि समाज एकच असून 'मी'ची 'आम्ही'कडे झालेली वाटचाल यांची यात्रा म्हणजे संघ होय, असे मार्गदर्शन संघाचे पश्चिम क्षेत्र प्रचारप्रमुख श्री. प्रमोद बापट यांनी केले. संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत उत्तर कोल्हापूर विभागाच्या वतीने ३ मे या दिवशी 'राजाभाऊ भोसले स्मृती भवन' येथे 'संघ शताब्दी मंथन' कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी सहकार्यवाह संजयराव भागवत आणि श्री. प्रमोद ढोले यांनीही उपस्थितांना संबोधित केले.
श्री. प्रमोद बापट पुढे म्हणाले, ''कोणताही समाज जागरूक असेल, तरच त्यांच्याकडून राष्ट्राची निर्मिती किंवा उभारणी होऊ शकते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारे समाजातील स्वत्वाची भावना जागवून देश कार्याला प्रोत्साहित केले जाते. संघानेही त्यांच्या रचनेच पालट केला असून अगदी संघाच्या गणवेशापासून ते रचनांमध्ये काळानुसार पालट घडवला गेला आहे. ज्या काळाला जी गोष्ट आवश्यक आहे, ती स्वीकारून त्यानुसार मार्गक्रमण करणे, ही आपली संस्कृती आणि परंपरा आहे. यावरच आपला देश टिकून आहे.''
या प्रसंगी श्री. संजय भागवत म्हणाले, ''एकसंघ कुटुंब, संस्कारक्षम पिढी, पर्यावरणपूरक जीवनशैली, स्वदेशी आणि नागरिक कर्तव्य जोपासना या मूल्यांच्या आधावर संघाचे कार्य चालू आहे.'' या प्रसंगी सर्वश्री विवेक मंद्रूपकर, अनिरुद्ध कोल्हापुरे, अधिवक्ता केदार मुनिश्वर, अधिवक्ता तन्मय मेवेकरी, हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
श्री. प्रमोद बापट यांनी अस्खलित मराठीत मार्गदर्शन करत, एकही इंग्रजी शब्द न वापरता रामायण, महाभारत, भगवद््गीता, संतांची वचने यांचे दाखले देत भारतीय संस्कृती, हिंदु धर्म, हिंदुत्व, भारतीय आणि पाश्चिमात्य संस्कृतीतील फरक यांविषयी अत्यंत समर्पक अशी उदाहरणे त्यांच्या भाषणात दिली.

