Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
संपादकीय : काँग्रेसची वैचारिक दिवाळखोरी !

संपादकीय : काँग्रेसची वैचारिक दिवाळखोरी !

भारतीय संसद, म्हणजे केवळ आरोप-प्रत्यारोपांचे नव्हे, तर देशाच्या धोरणांविषयी विचारमंथन करणारे एक महत्त्वाचे व्यासपीठ मानले जाते. संसदेचा दर्जा टिकवून ठेवण्याचे दायित्व प्रत्येकाचे आहे.

संसदेत वापरली जाणारी भाषा आणि शब्द यांचे महत्त्व सामान्य राजकीय सभेपेक्षा कितीतरी पटींनी अधिक असते. नुकतेच काँग्रेसच्या नेत्या खासदार प्रियांका वाड्रा यांनी 'आयआयटी मद्रास'चे संचालक आणि प्रख्यात संगणक शास्त्रज्ञ प्रा. व्ही. कामकोटी यांचा उल्लेख 'गोमूत्र एक्सपर्ट' असा केला. असे म्हणून त्या हसल्या आणि त्यांच्या जोडीला काँग्रेसचे अनेक खासदारही टाळ्या वाजवत हसतांना दिसले. यातूनच काँग्रेसवाल्यांची बौद्धिक पातळी दिसून येते. खरेतर संसदेत असा थिल्लरपणा अशोभनीयच ! अशांवर सरकारने कारवाईच करायला हवी ! हातातील सुटत चाललेले असतांनाही 'काँग्रेसच सर्वकाही' अशा आविर्भावात प्रियांका आहेत. त्यामुळेच तर अशा प्रकारे उद्धटपणाचे बोलणे त्यांच्याकडून केले गेले. सार्वजनिक जीवनातील सभ्यता आणि विद्वानांचा सन्मान या पार्श्वभूमीवर प्रियांका वाड्रा यांच्यावर देशभरातून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. लोकशाहीत टीका करण्याचा विरोधकांना अधिकार आहे; पण 'आपण कुणावर आणि कशा स्वरूपाची टीका करत आहोत', याचे भान असायला हवे; पण दुर्दैवाने प्रियांका वाड्रा यांच्यात ते नाही. प्रा. व्ही. कामकोटी हे व्यक्तीमत्त्वच महनीय आहे. त्यांनी संगणकीय विज्ञान, स्वदेशी 'मायक्रोप्रोसेसर' विकास, राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित तांत्रिक संशोधन आणि उच्च शिक्षण क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. अशा व्यक्तीचा अपमान करणे, म्हणजे त्यांच्या संपूर्ण कार्याची किंमतच न्यून केल्यासारखे आहे. त्यांचा अपमान, म्हणजे संपूर्ण भारतीय विज्ञान, भारतीय शिक्षणव्यवस्था आणि गुणवत्तेची संस्कृती यांचाच अपमान होय. अतुलनीय कार्य केलेल्या कामकोटी यांनी १५० हून अधिक संशोधन प्रबंध लिहिलेले आहेत, तसेच ४ डझनांहून अधिक सरकारी संशोधन संस्थांमध्ये त्यांनी नेतृत्व केलेले आहे. १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच्.डी. संपादन केली आहे; पण प्रियांका वाड्रा यांचे कर्तृत्व काय ? राजकीय वारशाच्या पलीकडे त्यांच्याविषयी कुणालाही काही सांगता येणार नाही. त्यांनी त्यांच्या कारकीर्दीत केलेले अपप्रकार सर्वांसमोर येतील. या अपमानाच्या विरोधात राष्ट्रप्रेमींनी संघटित होऊन प्रियांका यांना त्यांची योग्य जागा दाखवून द्यायला हवी.

प्रा. व्ही. कामकोटी हे स्वतः अनेक धार्मिक संघटनांशी संबंधित असून भारतातील वैदिक प्रणालींवर सतत चर्चा आणि संशोधन करतात. त्यांनी मध्यंतरी सांगितले होते, 'गोमूत्रात 'अँटी बॅक्टेरियल' (जिवाणूविरोधात), 'अँटी फंगल' (बुरशीविरोधात) आणि पचनास साहाय्य करणारे गुणधर्म आहेत. त्यामुळे ते 'इरिटेबल बोवेल सिंड्रोम (आतड्यांच्या बिघाडामुळे होणारा पचनसंस्थेचा विकार)' यांसारख्या काही आजारांसाठी उपयुक्त औषध ठरू शकते.' त्यांच्या या विधानावर टीका झाली होती; पण त्यांनी संशोधनपर निबंध आणि काही 'पेटंट' सादर करत स्वतःच्या विधानाची सत्यता मांडली होती. त्या पार्श्वभूमीवर प्रियांका यांनी वरील अपमानास्पद उल्लेख केला. एखाद्याच्या विधानाशी असहमती असूही शकते; पण त्याची खिल्ली उडवणे अयोग्यच ! त्यातही संसदेसारख्या सार्वजनिक ठिकाणी अपमान करणे, हे लोकशाहीतील निरोगी संवादाचे लक्षण नाही. उद्या हीच पद्धत प्रत्येकाने अवलंबली, तर देशातील अनेक महनीय व्यक्तींविषयीचा आदर न्यून होऊ शकतो. उच्चशिक्षित, तसेच अनेक दशके संशोधन क्षेत्रात योगदान देणार्‍या प्रा. कामकोटी यांच्यासारख्या व्यक्तीला 'शिक्षण काय समजते ?', असे विचारणे, म्हणजे स्वतःच्याच अज्ञानीपणाचे प्रदर्शन केल्यासारखे आहे. काँग्रेसची कारकीर्दच मुळात इतरांवर टीका-टिपण्या, कथित समाजवाद पसरवण्यात आणि कुरघोडी करण्यात गेल्याने प्रियांका यांच्याही पदरी तेच सर्व आले आहे. ज्यांच्याकडे संस्कारांची शिदोरीच नसते, ते अशी वायफळ बडबड करत रहातात. छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही संदर्भात काँग्रेसवाल्यांनी याआधीही अवमानजनकच शब्द उच्चारले होते. हीच (कु)संस्कृती काँग्रेसची पिलावळ आज पुढे चालवत आहे. भारतीय संस्कृतीत ज्ञानाला सर्वोच्च स्थान दिलेले आहे; म्हणूनच तर 'विद्या विनयेन शोभते ।', असे म्हटले जाते; पण संस्कृती, ज्ञान, विनय हे शब्दच काँग्रेसच्या शब्दकोशात नाहीत. विचारांना विचारांनी उत्तर द्यायचे असते. पुराव्यांचे पुराव्यांनीच खंडण करायचे असते आणि मतभेद झाल्यास सभ्य भाषेत व्यक्त व्हायचे असते, हे व्यवहारातील साधे गणित आहे; पण ते अज्ञानीजनांना कसे ठाऊक असणार ? विद्वानांची कदर करायची असेल, तर स्वतः प्रथम बुद्धीमान असावे लागते.

लोकशाहीत टीका करतांना काही मर्यादा पाळाव्या लागतात. त्या अनुषंगाने विरोध हा वैचारिकच असायला हवा; पण सध्याचे चित्र पाहिले, तर विचारांपेक्षा आक्रमकताच अधिक जाणवते. उपहास करणे, टोमणे मारणे किंवा टीका केल्यास अधिक प्रसिद्धी मिळत असल्याने वैचारिक प्रतिवादाकडे कुणाचाच कल राहिलेला नाही. प्रत्येक जण हीन पातळीला जाण्याचाच प्रयत्न करतो; पण यावर नियंत्रण आणले गेले पाहिजे. राजकीय पक्षात ही चढाओढ अधिक दिसून येते. कोणत्याही नेत्याने वैज्ञानिक असो, न्यायाधीश असो, शिक्षक असो किंवा कोणत्याही प्रतिष्ठित व्यक्तीचा अपमान केला, तर लोकशाहीच्या समानतेच्या तत्त्वांनुसार त्याच्यावर कारवाई व्हायला हवी. लोकप्रतिनिधींची भाषा समाजात अनुकरणीय मानली जाते. त्यामुळे संसदेतील लोकप्रतिनिधींची भाषा ही संयमी आणि सन्मानजनक असेल, तरच त्यांच्याकडून व्यक्त होणारे विचार प्रभावी अन् दिशादायी असू शकतात. टीका कठोर जरूर असावी; पण ती व्यक्तीच्या प्रतिष्ठेला धक्का लावणारी नको आणि भाषेत संयमीपणा असावा, हा सुसंस्कृतपणाचा किमान नियम काँग्रेसने पाळायला हवा. अर्थात् सुसंस्कृतपणा जपतील, ते काँग्रेसवाले कसले ?

राष्ट्रहित जपणारा समाज हा विद्वानांचा गौरव करतो. ज्ञान, संशोधन आणि राष्ट्रकार्य यांसाठी आयुष्य वेचलेल्या विद्वानांचा उपहास करून राजकीय टाळ्या मिळवणे, हे त्या व्यक्तीचे नव्हे, तर काँग्रेवाल्यांचेच अधःपतनच आहे. लोकशाहीत अशांची बाष्कळ बडबड ऐकावी लागत असेल, तर त्याला नागरिकच उत्तरदायी आहेत. अशा लोकप्रतिनिधींना निवडून देणार्‍यांनी याचा गांभीर्याने विचार करायला हवा ! नागरिकांनी आतातरी जागृत होऊन अशा प्रवृत्तींना लोकशाही मार्गाने योग्य उत्तर द्यायला हवे. विद्वत्तेचा अपमान आणि अज्ञानाचा गौरव करणारी प्रवृत्ती राष्ट्राच्या प्रगतीस घातक ठरते. अशा कुसंस्कृत राजकारणाला नाकारून ज्ञान, संस्कार आणि राष्ट्रहित यांना सर्वोच्च स्थान दिल्यास तीच राष्ट्रकर्तव्याची पूर्तता ठरेल !

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi