Dailyhunt
सांगलीतील संभाव्य पावसाळा आणि पूरस्थिती लक्षात घेता गावपातळीवर सूक्ष्म नियोजन करा ! - जिल्हाधिकारी

सांगलीतील संभाव्य पावसाळा आणि पूरस्थिती लक्षात घेता गावपातळीवर सूक्ष्म नियोजन करा ! - जिल्हाधिकारी

सांगली - संभाव्य पावसाळा आणि पूरस्थिती लक्षात घेता संबंधित शासकीय यंत्रणांनी गावपातळीवर सूक्ष्म नियोजन करावे. नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रभावी आराखडा सिद्ध ठेवून सर्व विभागांनी परस्परांशी समन्वय साधावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात २७ एप्रिल या दिवशी आयोजित आपत्ती व्यवस्थापन पूर्वसिद्धता आढावा बैठकीत ते बोलत होते.
वर्ष २०१९ आणि २०२१ मधील महापुराचा अनुभव लक्षात घेता जिल्ह्यातील १०० हून अधिक गावे बाधित होतात. यंदा या गावांची संख्या अल्प करण्यासाठी आतापासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. निवार्‍यासाठी वापरण्यात येणार्‍या शाळा आणि अंगणवाड्या सुस्थितीत असल्याची निश्चिती करावी. धोकादायक इमारतींचे पंचनामे करून संबंधितांना त्वरित सूचना द्याव्यात. आपत्कालीन स्थितीत अन्नधान्य, औषधे, पिण्याचे पाणी आणि गॅस पुरवठा खंडित होणार नाही, याची दक्षता घ्यावी. आरोग्य यंत्रणेने रुग्णवाहिका आणि साहाय्य केंद्रे सज्ज ठेवावीत. पाटबंधारे विभागाने धरणातील पाणीसाठा आणि पूरपातळी यांविषयी सतर्क रहावे. प्रत्येक गावात एक 'आपदा मित्र' सिद्ध करून आपत्ती व्यवस्थापनाची 'रंगीत तालीम' घ्यावी.
या बैठकीत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी ग्रामस्तरीय आराखडे अद्ययावत् करण्याच्या सूचना दिल्या. महानगरपालिका आयुक्त संजीता महापात्रा यांनी वीजपुरवठा आणि स्वच्छ पाणीपुरवठा यांच्यातील समन्वयावर भर दिला. 'वीज कापल्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होऊ नये, यासाठी महावितरणने पाणीपुरवठा विभागाशी संपर्क ठेवावा', असे त्यांनी नमूद केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi