Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
संस्कृत : भारताच्या आत्म्याची भाषा, परकीय नव्हे !

संस्कृत : भारताच्या आत्म्याची भाषा, परकीय नव्हे !

'हिंदी आणि उर्दू या भारतीय भाषा आहेत, संस्कृत मात्र बाहेरून आली आहे', असे एखाद्या लोकप्रतिनिधीकडून विधान येणे, हे केवळ दुर्दैवीच नाही, तर भारतीय इतिहास, भाषाविज्ञान आणि संस्कृती यांविषयीच्या अज्ञानाचेही द्योतक आहे.

लोकशाहीमध्ये मतभिन्नतेला स्थान असते; परंतु इतिहासाचे विकृतीकरण करण्याचा अधिकार कुणालाही नाही. संस्कृत ही भारतभूमीवर विकसित झालेली, भारतीय संस्कृतीच्या प्रत्येक श्वासात मिसळलेली आणि जगातील सर्वांत प्राचीन ज्ञानपरंपरेची भाषा आहे. तिला 'परकीय' म्हणणे, म्हणजे भारताच्या सांस्कृतिक स्मृतीवरच प्रश्नचिन्ह उभे करणे होय.

संस्कृत ही केवळ एक भाषा नाही, ती भारतीय सभ्यतेची विचारभाषा आहे. ऋग्वेदापासून उपनिषदांपर्यंत, रामायण-महाभारतापासून कालिदासाच्या काव्यापर्यंत, पाणिनीच्या व्याकरणापासून आर्यभट्टाच्या गणितापर्यंत आणि चरक-सुश्रुतांच्या आयुर्वेदापासून पतंजलींच्या योगदर्शनापर्यंत भारताने जगाला दिलेले ज्ञान संस्कृतमधूनच व्यक्त झाले आहे. अशी भाषा परकीय असू शकते का ?

भारतीय परंपरेत संस्कृतला देववाणी म्हटले आहे,

संस्कृतं नाम दैवी वागन्वाख्याता महर्षिभिः ।

अर्थ : महर्षींनी संस्कृत भाषेला 'दैवीवाणी' असे म्हटले आहे.

महर्षींनी विकसित केलेली आणि ज्ञानाच्या अभिव्यक्तीसाठी परिष्कृत केलेली ही भाषा आहे.

वेदांच्या संदर्भात भारतीय तत्त्वज्ञान म्हणते,

'अनादिनिधना नित्या वागुत्सृष्टा स्वयम्भुवा ।'(महाभारत, शान्तिपर्व, अध्याय २३२, श्लोक २४), म्हणजे 'ब्रह्मदेवाने आदि आणि अंत नसलेली वाणी निर्माण केली.' हा धार्मिक विश्वास असला, तरी भाषावैज्ञानिक दृष्टीनेही संस्कृतचा विकास भारतीय उपखंडातच झाल्याचे पुरावे उपलब्ध आहेत.

संस्कृत 'बाहेरून आली', या दाव्याचा कोणताही पुरातत्त्वीय, भाषिक किंवा ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही. उलट ऋग्वेदातील वैदिक संस्कृत, त्यानंतरची ब्राह्मणग्रंथे, आरण्यके, उपनिषदे, सूत्रकालीन साहित्य आणि पुढे महर्षि पाणिनींची 'अष्टाध्यायी' हा संपूर्ण विकास भारतीय भूभागात घडलेला आहे. जगातील इतर कोणत्याही प्रदेशात संस्कृतच्या या उत्क्रांतीचा मागोवा सापडत नाही.

वैदिक संस्कृत पुढे अधिक परिष्कृत होत गेली आणि लौकिक अथवा 'क्लासिकल' (शास्त्रीय) संस्कृतचा विकास झाला. या विकासात महर्षि पाणिनी यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. त्यांच्या 'अष्टाध्यायी' या व्याकरणग्रंथाने भाषेची ध्वनीसंरचना, शब्दरचना, रूपप्रक्रिया आणि वाक्यरचना अत्यंत शास्त्रीय पद्धतीने निश्चित केली. जगातील सर्वश्रेष्ठ व्याकरणग्रंथांमध्ये 'अष्टाध्यायी'चा समावेश केला जातो. आधुनिक भाषाशास्त्र आणि संगणकीय भाषाविज्ञानातही पाणिनींच्या नियमांचा अभ्यास केला जात आहे. यावरून संस्कृत ही भारतात विकसित झालेली अत्यंत वैज्ञानिक भाषा असल्याचे अधोरेखित होते.

आज जागतिक भाषाशास्त्रज्ञ पाणिनींच्या व्याकरणाला मानवी बुद्धीमत्तेचा अद्वितीय आविष्कार मानतात. नोम चॉम्स्कीपासून आधुनिक संगणकीय भाषावैज्ञानिकांपर्यंत अनेक विद्वानांनी संस्कृतच्या व्याकरणिक रचनेचे कौतुक केले आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय), नैसर्गिक भाषा प्रक्रिया (एन्.एल्.पी.) आणि संगणकीय भाषाविज्ञानात संस्कृतच्या संरचनात्मक वैशिष्ट्यांचा अभ्यास चालू आहे. भूतकाळातील भाषा भविष्याच्या तंत्रज्ञानासाठी प्रेरणास्थान ठरत असेल, तर तिला 'मृत' वा 'परकीय' म्हणणे किती विसंगत आहे !

भारतातील जवळपास सर्व आधुनिक भारतीय भाषांमध्ये संस्कृतचा प्रभाव स्पष्ट दिसतो. मराठी, हिंदी, बंगाली, ओडिया, गुजराती, आसामी, नेपाळी, कन्नड, तेलुगु, मल्याळम्, कोकणी या सर्व भाषांचा मूलभूत शब्दसाठा आणि वैचारिक शब्दसंपदा संस्कृतमधून समृद्ध झाली आहे. हिंदीचा पाया संस्कृतवर उभा आहे; मराठीचे व्याकरण आणि साहित्य संस्कृतशी घट्ट जोडलेले आहे; उर्दूमध्येही सहस्रो तत्सम आणि तद्भव शब्द संस्कृतमधून अप्रत्यक्षरित्या आले आहेत. त्यामुळे संस्कृत ही कोणत्याही भारतीय भाषेची प्रतिस्पर्धी नसून सर्वांची सांस्कृतिक जननी आहे.

महाकवी कालिदासांनी संस्कृतला विश्वमान्यता प्राप्त करून दिली. 'रघुवंश', 'कुमारसंभव', 'अभिज्ञानशाकुन्तलम्' आणि 'मेघदूतम्' यांसारख्या ग्रंथांनी भारतीय साहित्याला जागतिक उंचीवर नेले. संस्कृत ही केवळ मंदिरातील भाषा नसून मानवतेच्या सर्वोच्च साहित्यिक अभिव्यक्तीची भाषा आहे. संस्कृतमध्ये निर्माण झालेले साहित्य हे केवळ धार्मिक नाही; ते मानवजातीच्या बौद्धिक इतिहासातील अमूल्य ठेवा आहे. महर्षि वाल्मीकींचे 'रामायण'; महर्षि व्यासांचे 'महाभारत', उपनिषदे, ब्राह्मणग्रंथ, वेदाङ्गे, कालिदासांचे काव्य, भर्तृहरींचे 'नीतीशतक', कौटिल्यांचे अर्थशास्त्र, चरकसंहिता, सुश्रुतसंहिता, पतंजलींचे 'योगसूत्र', आर्यभट्ट आणि भास्कराचार्य यांचे गणित अन् खगोलशास्त्र या सर्वांनी भारताच्या ज्ञानपरंपरेला जागतिक उंची प्राप्त करून दिली.

भारतीय संस्कृतीत ज्ञानाचे सर्वोच्च महत्त्व अधोरेखित करणारा श्लोक आजही तितकाच अर्थपूर्ण वाटतो,

विद्या नाम नरस्य रूपमधिकं प्रच्छन्नगुप्तं धनम् ।
विद्या भोगकरी यशःसुखकरी विद्या गुरूणां गुरुः ।। - नीतीशतक, श्लोक २०

अर्थ : विद्या मनुष्याचे श्रेष्ठ रूप आहे, अत्यंत गुप्त धन आहे.विद्या भोग, यश, तसेच सुख उत्पन्न करणारी आहे. विद्या गुरूंचीही गुरु आहे.

ही विद्या सर्वाधिक प्रमाणात ज्या भाषेत जतन झाली, ती भाषा म्हणजे संस्कृत. आज राष्ट्रीय शिक्षण धोरण (एन्.ई.पी.-२०२०), भारतीय ज्ञानपरंपरा (इंडियन नॉलेज सिस्टम्स), योग, आयुर्वेद, खगोलशास्त्र, तत्त्वज्ञान, पर्यावरणशास्त्र आणि नीतीशास्त्र या क्षेत्रांत संस्कृतचा पुनर्जागरणाचा काळ चालू आहे. देश-विदेशातील विद्यापिठे संस्कृत अभ्यासक्रम चालू करत आहेत. संशोधन वाढत आहे. भारतीय राज्यघटनेच्या ८ व्या अनुसूचीमध्ये संस्कृतला अिधकृत स्थान आहे. सहस्रो विद्यार्थी, संशोधक आणि विद्वान आजही संस्कृतमध्ये कार्यरत आहेत. जिवंत परंपरेला 'परकीय' म्हणणे, म्हणजे वास्तव नाकारणे होय.

आज आवश्यकता आहे ती संस्कृतला राजकारणाच्या चष्म्यातून न पहाता ज्ञानाच्या दृष्टीने पहाण्याची. संस्कृत कोणत्याही धर्माची किंवा पक्षाची मक्तेदारी नाही, ती संपूर्ण भारताची सांस्कृतिक आणि बौद्धिक संपत्ती आहे. या भाषेत भारताचे तत्त्वज्ञान, विज्ञान, साहित्य, न्याय, योग, आयुर्वेद, कला आणि जीवनदृष्टी जतन झालेली आहे. संस्कृतने केवळ ज्ञानच दिले नाही, तर जीवनमूल्येही दिली. भारतीय संस्कृतीच्या सर्वसमावेशक वृत्तीचे दर्शन घडवणारा हा शांतीमंत्र आज संपूर्ण जगासाठी मार्गदर्शक आहे,

सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः ।
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग्भवेत् ।।

अर्थ : सर्व प्राणीमात्र सुखी होवोत. सर्वांना चांगले आरोग्य लाभो. सर्वजण एकमेकांचे कल्याण पाहोत. कुणाच्याही वाट्याला कधीही दुःख न येवो.

या ओळींमध्ये मानवकल्याण, समता, आरोग्य आणि विश्वबंधुत्व यांचा संदेश दडलेला आहे. म्हणूनच संस्कृत ही केवळ एका समाजाची किंवा धर्माची भाषा नसून संपूर्ण मानवतेसाठी कल्याणाची भाषा आहे.

भारतातील जवळपास सर्व आधुनिक भाषांवर संस्कृतचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. सर्व भाषांचा शब्दसंग्रह, व्याकरण आणि वैचारिक शब्दसंपदा संस्कृतमुळे समृद्ध झाली आहे. उर्दूमध्येही संस्कृतमधून विकसित झालेल्या प्राकृत-अपभ्रंश परंपरेचा अप्रत्यक्ष प्रभाव आढळतो. त्यामुळे संस्कृत ही इतर भाषांची प्रतिस्पर्धी नसून त्यांना समृद्ध करणारी मातृपरंपरा आहे. संस्कृतने भारतीय उपखंडाला सांस्कृतिक एकात्मता प्रदान केली. वैदिक, बौद्ध, जैन, शैव, वैष्णव, शाक्त अशा विविध तत्त्वपरंपरांमध्ये संस्कृतचा व्यापक वापर झाला. संवाद, चिंतन आणि शास्त्रार्थ यांचे माध्यम म्हणून संस्कृतने विविध परंपरांना एकत्र बांधले. म्हणूनच ती भारतीय एकात्मतेचा सांस्कृतिक सेतू मानली जाते.

संस्कृतला परकीय म्हणणारे विधान क्षणिक राजकीय चर्चेचा विषय ठरू शकते; परंतु सत्य त्यापेक्षा मोठे असते. भारताचा इतिहास, भारतीय संस्कृती आणि ज्ञानपरंपरा यांचा विचार केला, तर एकच निष्कर्ष स्पष्टपणे समोर येतो, 'संस्कृत ही भारताच्या आत्म्याची भाषा आहे. ती या भूमीची स्मृती, ओळख आणि भविष्याचाही भक्कम पाया आहे.' म्हणूनच संस्कृतला परकीय म्हणणे, म्हणजे भारताच्या इतिहासाचा, ज्ञानपरंपरेचा आणि सांस्कृतिक अस्मितेचाच अपमान होय.

संस्कृत ही भारताच्या आत्म्याची भाषा आहे. ती आपल्या विचारांची, विज्ञानाची, साहित्याची, तत्त्वज्ञानाची आणि राष्ट्रीय ओळखीची आधारशीला आहे. भारताच्या भविष्याचा मार्ग शोधायचा असेल, तर आपल्या भूतकाळातील या अमूल्य ज्ञानसंपदेचे जतन आणि संवर्धन करणे, हेच खरे राष्ट्रीय उत्तरदायित्व आहे. संस्कृत ही भूतकाळाची स्मृती नाही, तर ती वर्तमानाची प्रेरणा आणि भविष्याचा प्रकाश आहे.

यावत् स्थास्यन्ति गिरयः सरितश्च महीतले ।
तावत् संस्कृतभाषायाः कीर्तिर्लोके प्रवर्तते ।।

अर्थ : जोपर्यंत भूतलावर पर्वत आणि नद्या आहेत, तोपर्यंत संस्कृतची कीर्ती जगात अजरामर राहील.

लेखिका : प्रा. डॉ. कविता सुनील होले, अधिष्ठाता, संस्कृत तथा संस्कृतेतर भाषा संकाय, कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक, नागपूर. (२८.७.२०२६)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi