तासगाव (जिल्हा सांगली) - मराठा साम्राज्याचे पराक्रमी सेनापती आणि तासगावच्या २४७ वर्षांच्या प्रसिद्ध रथोत्सव परंपरेचे अधिष्ठान असलेल्या श्री गणपति मंदिराचे संस्थापक श्रीमंत परशुरामभाऊ पटवर्धन (वर्ष १७४०-१७९९) यांच्या जीवनकार्यावर आधारित चरित्रग्रंथाचा प्रकाशन सोहळा तासगाव येथील श्री गणपति मंदिरात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
सांगली येथील इतिहासप्रेमी आणि संशोधक महेश कदम यांच्या लेखणीतून साकारलेल्या या ग्रंथाचे प्रकाशन 'मिरज संस्थान'चे 'हिज हायनेस' श्रीमंत गंगाधरराव बाळासाहेब पटवर्धन सरकार यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमात श्रीमंत माधवराजे यांनी परशुरामभाऊंच्या दुर्मिळ युद्धतंत्र आणि रणनीती यांचा सविस्तर आढावा घेतला. भाऊंच्या जलद हालचाली, अल्प सैन्यबळाचा प्रभावी वापर आणि युद्धातील कौशल्याची परकीयांनीही नोंद घेतल्याचे त्यांनी विविध ऐतिहासिक दाखल्यांतून स्पष्ट केले. लेखक महेश कदम यांनी परशुरामभाऊंच्या कार्याचा गेल्या ५-६ वर्षांपासून केलेल्या संशोधनातील अनुभव कथन केले. हा ग्रंथ केवळ एका व्यक्तीच्या चरित्राचे लेखन नसून परशुरामभाऊंसह इतिहासातील असंख्य अनामवीरांच्या कार्याचा शोध घेण्याचा हा प्रारंभ असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी भाजप खासदार संजयकाका पाटील यांनी इतिहासातून नवीन पिढीने प्रेरणा घेण्याची आवश्यकता व्यक्त केली. तासगावच्या नगराध्यक्षा सौ. विजया पाटील यांनी परशुरामभाऊंचा इतिहास पुस्तकाच्या माध्यमातून उजेडात आणल्याविषयी पटवर्धन कुटुंबियांचे आभार मानले. परशुरामभाऊंच्या सातव्या पिढीचे वारसदार श्रीमंत राजेंद्र परशुराम पटवर्धन तासगावकर यांनी प्रदीर्घ काळानंतर भाऊंचे चरित्र प्रकाशित होत असल्याबद्दल समस्त तासगावकरांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली. परशुरामभाऊंच्या ८ व्या पिढीचे प्रतिनिधी श्रीमंत राहुल पटवर्धन यांच्या पत्नी सौ. मनीषा पटवर्धन आणि कन्या इशाना, श्रीमंत माधवराजे पटवर्धन, त्यांच्या पत्नी अनुसयाराजे, तसेच पटवर्धन घराण्यातील मान्यवर यांच्यासह तासगाव शहरातील श्री गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

