धाराशिव - केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत पोचवण्यासाठी 'मल्टिमीडिया' प्रदर्शन हे प्रभावी माध्यम आहे, असे मत जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले.
केंद्रीय संचार ब्युरो आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने मध्यवर्ती बसस्थानकात आयोजित २ दिवसांच्या 'मल्टिमीडिया छायाचित्र प्रदर्शना'च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
'१२ वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची - विकसित भारत-जी राम जी विधेयक २०२५ आणि राष्ट्रीय पोषण अभियान' या संकल्पनेवर प्रदर्शन आधारित आहे. प्रदर्शनात केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती छायाचित्रे आणि विद्युत्चित्रफलक ('एल्.ई.डी. वॉल'च्या) माध्यमातून देण्यात येत आहे. यामध्ये प्रधानमंत्री आवास, जनधन, उज्ज्वला, पी.एम्.-कुसुम, विश्वकर्मा, मातृत्व वंदना, नवउद्योजकता (स्टार्टअप) यांसह विविध योजनांचा समावेश आहे.
'राष्ट्रीय पोषण माह'निमित्त पोषण आहार, भरड धान्यांचे महत्त्व आणि पाककृती यांसाठी विशेष दालन उभारण्यात आले आहे. 'हरित धाराशिव' उपक्रमांतर्गत नागरिकांना चिंच, पेरू, जांभूळ आदी देशी वृक्षांची रोपे विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
हे प्रदर्शन १ आणि २ सप्टेंबर या दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत नागरिकांसाठी विनामूल्य खुले रहाणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

