पुणे - बीड जिल्हा रुग्णालयातील आधुनिक वैद्यांच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे सिझेरियन शस्त्रक्रियेच्या वेळी एका महिलेच्या पोटात शस्त्रक्रियेचे हातमोजे (ग्लोव्हज) आणि 'पेपर वाईप्स' (रक्त शोषण्यासाठीचे कागद) राहिले.
या गंभीर निष्काळजीपणाच्या विरोधात कुटुंबियांनी रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार प्रविष्ट केली आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांनी संबंधित दोषी आधुनिक वैद्य आणि कर्मचारी यांना नोटीस बजावली असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
१ ऑगस्टला बीड जिल्हा रुग्णालयात संध्या गायकवाड यांची प्रसूती शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर घरी गेल्यावर त्यांना असह्य वेदना चालू झाल्या. तपासणीनंतर त्यांच्या पोटात बाह्य वस्तू असल्याचे आढळले. प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयात नेण्यात आले. तेथील शल्यविशारदांनी तातडीने शस्त्रक्रिया करून पोटातून हे साहित्य बाहेर काढले.

