Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
शिक्षकी पेशाचे अधःपतन !

शिक्षकी पेशाचे अधःपतन !

देशभरातील कोट्यवधी विद्यार्थ्यांचे भवितव्य आणि महत्त्वाकांक्षा ज्या 'नीट' (नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट - राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा) परीक्षेवर अवलंबून आहेत, त्यात झालेला महाघोटाळा केवळ एक आर्थिक गुन्हा नसून आपल्या संपूर्ण शैक्षणिक आणि सामाजिक व्यवस्थेला लागलेली भयंकर कीड आहे.

या प्रकरणात समोर आलेले धागेदोरे आणि अटक करण्यात आलेले प्राध्यापक, संस्थाचालक यांचा सहभाग पाहिला, तर आजची शिक्षणव्यवस्था किती खालच्या पातळीला पोचली आहे, हे स्पष्ट होते. दिवस-रात्र एक करून, उपाशीपोटी आणि हलाखीच्या परिस्थितीत अभ्यास करणार्‍या लाखो गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांतील मुलांच्या कष्टाची किंमत या घोटाळेबाजांनी अक्षरशः शून्य केली आहे ! यामुळे विद्यार्थ्यांची केवळ आर्थिक हानी झाली नाही, तर त्यांचे प्रचंड मानसिक खच्चीकरण झाले आहे. भ्रष्ट प्रवृत्तींमुळे संपूर्ण परीक्षा यंत्रणेवरील जनतेचा विश्वास उडाला आहे. भारतीय संस्कृतीत 'गुरु'चे स्थान देवाच्या तोडीचे मानले गेले आहे. 'ज्ञानदान' हे मानवी जीवनातील सर्वोच्च आणि सात्त्विक कार्य मानले जाते; परंतु 'नीट' घोटाळ्यात पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयाच्या जीवशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका मनीषा मांढरे आणि लातूरच्या नामांकित 'आर्.सी.सी' शिकवणीवर्गाचे प्रा. शिवराज मोटेगावकर यांना 'सीबीआय'ने अटक केली आहे. २५ वर्षांचा प्रदीर्घ अध्यापनाचा अनुभव असलेल्या प्राध्यापिकेने स्वतःच्या स्मरणशक्तीचा आणि राष्ट्रीय परीक्षा संस्थेने ठेवलेल्या विश्वासाचा अपवापर करून प्रश्नपत्रिका उघड केली. पैशांच्या हव्यासापोटी आणि स्वार्थासाठी ज्यांच्यावर विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवण्याचे दायित्व आहे, त्यांनीच विद्यार्थ्यांच्या विश्वासाचा घात केला आहे. हा केवळ कायद्याचा भंग नसून संपूर्ण शिक्षकी पेशाला काळीमा फासणारे कृत्य आहे.

आज शिक्षण ही 'सेवा' न रहाता एक 'व्यवसाय' बनली आहे. गल्लीबोळात आणि शहरांमध्ये कोट्यवधी रुपयांचे साम्राज्य उभे केलेले शिकवणीवर्ग हे या भ्रष्टाचाराचे मुख्य केंद्र बनले आहेत. एका खोलीतून चालू होऊन १०० कोटी रुपयांचे साम्राज्य उभे करणार्‍या आणि ८ शहरांमध्ये विस्तार करणार्‍या शिकवणीवर्गाचे चालक प्रा. मोटेगावकर आज 'सीबीआय'च्या कोठडीत आहेत. स्वतःच्या मुलांना कोणत्याही मार्गाने 'डॉक्टर' बनवण्यासाठी पालकही १५ ते २० लाख रुपये मोजून प्रश्नपत्रिका विकत घेण्यास सिद्ध होतात, ही मानसिकता अत्यंत घातक आहे. जेव्हा गुणवत्तेहून पैशाच्या बळावर डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहिले जाते, तेव्हा भविष्यात समाजाला मिळणारे वैद्यकीय उपचार किती खालावलेल्या दर्जाचे असतील, याची कल्पनाच करवत नाही. आजच्या शिक्षणव्यवस्थेत केवळ 'माहिती' दिली जाते, 'संस्कार' दिले जात नाहीत. केवळ गुणांची स्पर्धा आणि भौतिक सुखांच्या मागे धावणार्‍या शिक्षणपद्धतीमुळे विद्यार्थी अन् शिक्षक यांच्यामध्येही नैतिकतेचा पूर्णपणे लोप झाला आहे. 'काहीही करून पैसा कमवणे आणि यशस्वी होणे', या एकाच विचाराने आजची पिढी अन् शिक्षक ग्रासले आहेत. जर शिक्षणव्यवस्थेत राष्ट्रप्रेम, प्रामाणिकपणा आणि आध्यात्मिक मूल्यांचे अधिष्ठान असते, तर २५ वर्षे सेवा केलेल्या प्राध्यापिकेने किंवा कोट्यवधी रुपये कमावणार्‍या संस्थाचालकांनी असा देशद्रोही आणि विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा मार्ग निवडला नसता. जोपर्यंत शिक्षणपद्धतीत आमूलाग्र पालट करून त्यात नैतिक आणि धर्माचरणाचे शिक्षण समाविष्ट केले जात नाही, तोपर्यंत अशा भ्रष्ट प्रवृत्ती निर्माण होतच रहातील. 'नीट' परीक्षेचा घोटाळा ही संपूर्ण देशासाठी धोक्याची घंटा आहे. या प्रकरणातील सर्व दोषींना कठपुतळीप्रमाणे नाचवणार्‍या मुख्य सूत्रधारांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. शिक्षणक्षेत्राचे पावित्र्य टिकवण्यासाठी आता संपूर्ण व्यवस्थेचे शुद्धीकरण करणे, हीच काळाची आवश्यकता !

- श्री. सचिन कौलकर, सनातन आश्रम, मिरज, सांगली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi