सांगली - हिंदुद्वेषी आणि इतिहासाचे विकृतीकरण करणार्या 'जोधा-अकबर' चित्रपटाला वर्ष २००८ मध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ यांनी विरोध केल्याने पोलिसांनी त्यांना कह्यात घेतले होते.
त्यांच्या सुटकेसाठी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढल्याच्या प्रकरणात १२५ हिंदुत्वनिष्ठांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सत्र न्यायाधीश श्रीमती एस्.एन्. शेट्टी यांनी हा निकाल दिला. यामध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. बजरंग पाटील, माजी उपमहापौर श्री. बटू बावडेकर यांसह अन्य प्रमुख कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
१. पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या नेतृत्वाखाली २७ फेब्रुवारी २००८ या दिवशी सांगली येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर हिंदुत्वनिष्ठांनी 'जोधा-अकबर' चित्रपटाच्या विरोधात आंदोलन केले होते.
२. या वेळी जमावबंदी आदेशाचा भंग केल्याचा ठपका ठेवत तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश यांनी पू. भिडेगुरुजी आणि आंदोलक यांच्यावर लाठीमार करून त्यांना कह्यात घेतले होते.
३. हिंदुत्वनिष्ठांच्या सुटकेसाठी सर्वश्री बजरंग पाटील, बटू बावडेकर, विजय भिडे यांच्यासह १२५ कार्यकर्ते पोलीस ठाण्यावर गेले होते. त्या वेळी पोलीस ठाण्याच्या खिडक्यांच्या काचा फुटल्याने आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप करत पोलिसांनी हिंदुत्वनिष्ठांवर गुन्हे नोंदवले होते.
४. या प्रकरणी पोलिसांनी आरोपपत्र प्रविष्ट केले होते; मात्र संशयितांच्या वतीने अधिवक्ता प्रकाश जाधव, अधिवक्ता मंगेश तांदळे, ओंकार कुलकर्णी आणि अन्य अधिवक्ते यांनी मांडलेली बाजू अन् पुराव्यांचा अभाव लक्षात घेता न्यायालयाने सर्वांची निर्दोष सुटका केली.
५. सर्वश्री विजय भिडे, बिपीन कदम, सुनीता मोरे, नारायण कदम, बाबा कदम हे निर्दोष सुटका झालेले अन्य हिंदुत्वनिष्ठ आहेत.

