Dailyhunt
श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी अधोरेखित केलेले अग्निदेवतेचे महत्त्व !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी अधोरेखित केलेले अग्निदेवतेचे महत्त्व !

'भारतीय सनातन हिंदु धर्म संस्कृती'नुसार 'अग्नि' ही देवता असून तिला 'अग्निनारायण' असे संबोधले गेले आहे.

तेजाची दोन रूपे आहेत, जी आपल्याला डोळ्यांनी दिसतात, एक म्हणजे भूतलावर दिसणारा प्रत्यक्ष अग्निनारायण !

आणि दुसरे आकाशात दिसणारा सूर्यनारायण ! अग्नीने आपले सर्व जीवनच व्यापले आहे. जन्माला येतांना नवजात अर्भक आईच्या गर्भातील सुप्त अग्नीशक्तीच्या साहाय्याने बाहेरच्या जगात ढकलले जाते. व्यक्तीचे 'उपनयन आणि विवाह' हे संस्कारही अग्नीच्या साहाय्यानेच होतात. व्यक्तीचे अंत्यसंस्कार करतांनाही अग्नीची आवश्यकता असते; म्हणूनच 'अग्नि' हा आपला कायमचा साहाय्यक आहे', असे म्हटले, तरी वावगे ठरणार नाही.

२ अ. अग्नीवर मांस शिजवून अग्निनारायणाचा अपमान करणारा कलियुगातील मानव : अग्नीचे अनन्यसाधारण महत्त्व आपल्या वेदशास्त्रांतही आढळते. श्रीविष्णूचे एक रूप असलेल्या अग्नीच्या साहाय्याने कलियुगातील मनुष्य स्वत:ची हौसमौज पुरवण्यासाठी अग्नीवर मांस शिजवून ते भक्षण करणे, मदिरापान करणे आदी कृतींद्वारे अग्नीचा अपमान करत आहे. महाराष्ट्रासारख्या आध्यात्मिक संपन्नता असलेल्या राज्यात महाबळेश्वर, कोल्हापूर आणि पुणे येथे अनेक ठिकाणी महामार्गांवरून जातांना 'चुलीवरचे मटण', 'चुलीवरचे चिकन' मिळेल', असे बरेच फलक वाचायला मिळतात. आपलेच (हिंदूच) लोक ते आवडीने खातात, याचे जास्त दु:ख वाटते. अग्नीचा हा अयोग्य वापर, म्हणजे मानव करत असलेले घोर पापच आहे. अग्नीपुढे होणारा वामाचार थांबलाच पाहिजे.

२ आ. मानव अधर्माचरण करत असल्याने प्रकृतीने माजवलेला हाहा:कार : हिंदूंनीच जर आपल्या देवतांची अशी विटंबना केली, तर कसे चालेल ? आज प्रकृतीनेही 'कोरोना विषाणू'च्या माध्यमातून जगभरात हाहा:कार माजवला आहे. चुकीच्या पद्धतीने मांसाहार केल्यामुळे मनुष्याचा कसा घात होऊ शकतो, याचे हे एक ज्वलंत उदाहरण आहे आणि त्याचा परिणाम संपूर्ण मानवजातीला भोगावा लागत आहे.

२ इ. ज्वालामुखीचा उद्रेक होणे किंवा जंगलात वणवा पेटून वनसंपत्तीची हानी होणे, अशा प्रकारे होत असलेला अग्नीचा प्रकोप ! : आता कलियुगात अग्नीचा प्रकोप म्हणून ज्वालामुखीचा उद्रेक होणे किंवा अकस्मात् जंगलात वणवा पेटून वनसंपत्तीची हानी होणे, असे प्रकार घडत आहेत. याचे एक उदाहरण म्हणजे ऑस्ट्रेलियात गेल्या कित्येक वर्षांपासून जंगलांत अनेक वेळा वणवे पेटतात. काही दिवसांपूर्वीच पुन्हा एकदा तेथे मोठा वणवा पेटून नैसर्गिक संपत्ती, प्राणी, पक्षी आदींची मोठी हानी झाली होती. हे वणवे म्हणजे मनुष्याच्या दुष्प्रवृत्तीची देवाने दिलेली शिक्षा आहे. अग्निनारायणाचा हा कोपच आहे.

वेदमंत्र शिकलेले काही पुरोहित अग्निनारायणाचा अपमान करतांना आढळतात. ते यज्ञात आहुती देतांना त्या आहुती अग्नीत अक्षरशः फेकत असतात. आहुतीसुद्धा शुद्ध आहेत कि नाही, याचीही पडताळणी होत नाही. बर्‍याचदा निकृष्ट दर्जाचे, म्हणजेच कीड लागलेले लाकूड वापरले जाते आणि निकृष्ट दर्जाच्या समिधा अग्नीत आहुती म्हणून दिल्या जातात. हा अग्निनारायणाचा घोर अपमान नव्हे काय ?

धर्मशास्त्रानुसार असलेले अग्निदेवतेचे महत्त्व जाणून त्याचा उपयोग सात्त्विक अन्न शिजवण्यासाठी करावा. या अन्नाच्या ग्रहणाने पाप न लागता आपल्यातील सत्त्वगुण वाढून त्याचा आपल्यालाच चांगला लाभ होईल. 'अग्निहोत्र, यज्ञ-याग आदींचे आध्यात्मिक महत्त्व समाजात सांगणे', या माध्यमातून अग्नीची उपासना करून त्याची कृपा संपादन केली, तर हाच अग्नी येणार्‍या विनाशकालात आपला रक्षणकर्ता होणार आहे. अशा या सार्‍या जगताचे पालनपोषण करणार्‍या 'अग्निनारायणा'ला साष्टांग दंडवत !'

- श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi