पुणे - राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्षाकडून घेण्यात आलेल्या एल्.एल्.बी.च्या तिसर्या वर्षाच्या परीक्षेत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करत अवमान केल्याचा संतापजनक प्रकार घडला.
या प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी दौंड विधानसभेचे भाजपचे आमदार राहुल कुल यांनी पत्राद्वारे केली आहे.
२ एप्रिल २०२६ या दिवशी पार पडलेल्या ऑनलाईन परीक्षेमधे सामान्य ज्ञान विभागात 'शिवाजीच्या मंत्रीमंडळाचे नाव काय होते ?', असा प्रश्न विचारण्यात आला होता.
आमदार कुल म्हणाले, ''परीक्षेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या थोर महापुरुषाचा उल्लेख एकेरी भाषेत होणे, ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. या प्रकारामुळे शिवप्रेमी आणि विद्यार्थी यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या संदर्भात अनेक परीक्षार्थींनी माझ्याकडे तक्रारही केली आहे.''
आमदार राहुल कुल यांनी पत्राद्वारे केलेल्या मागण्या
१. सदर प्रश्नपत्रिका संकलित करणारी समिती आणि संबंधित उत्तरदायी अधिकारी यांच्यावर तातडीने कठोर प्रशासकीय कारवाई करावी.
२. सीईटी विभागाने या गंभीर चुकीविषयी सार्वजनिकरित्या क्षमायाचना प्रसिद्ध करावी.
३. भविष्यात कोणत्याही शासकीय किंवा शैक्षणिक परीक्षेत महापुरुषांचा अवमान होणार नाही, याची स्पष्ट नियमावली सिद्ध करावी.
४. सर्व शैक्षणिक साहित्यात आणि प्रश्नपत्रिकेत 'छत्रपती शिवाजी महाराज' असाच पूर्ण आणि आदरयुक्त उल्लेख करणे अनिवार्य करण्यात यावे.

