कोल्हापूर, २२ ऑगस्ट (वार्ता.) - जिवाची पर्वा न करता देशाच्या सीमेचे रक्षण करणार्या सैनिकांच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी आणि त्यांचे नैतिक बळ वाढवण्यासाठी 'श्री स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्ट', कोल्हापूरच्या वतीने 'एक राखी सीमेवरील जवानांसाठी' हा उपक्रम यंदाही राबवण्यात येत आहे.
कारगिल युद्धापासून चालू असलेल्या या उपक्रमाचे हे सलग २७ वे वर्ष आहे, अशी माहिती 'ट्रस्ट'चे अध्यक्ष श्री. किशोर घाटगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी सचिव श्री. राजेंद्र मकोटे, श्री. महेश कामत, श्री. कमलाकर किलकिले, डॉ. सायली कचरे, नगरसेविका माधुरी किरण नकाते यांसह अन्य उपस्थित होते.
१. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालये, महिला बचत गट आणि महिला संस्था यांच्याकडून राख्यांचे संकलन केले जाते. त्यानंतर 'मराठा बटालियन'च्या सहकार्याने या राख्या थेट सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांपर्यंत पाठवण्यात येतात.
२. प्रत्येक वर्षी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून एक लाखांहून अधिक राख्या संकलित केल्या जातात. यंदाचा जाहीर कार्यक्रम २५ ऑगस्ट या दिवशी सकाळी ११.३० वाजता महादेव मंदिर ते बटालियन, टेंबलाईवाडी मंदिरासमोर होणार आहे. शहर आणि जिल्ह्यातील विविध संकलन केंद्रांवर २४ ऑगस्टच्या सायंकाळी ५ वाजेपर्यंत राख्या जमा कराव्यात, असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

