कुडाळ - तालुक्याची आमसभा यापूर्वी ९ मार्च २०१९ या दिवशी झाली होती. त्यानंतर तब्बल ७ वर्षांनी २७ एप्रिल २०२६ या दिवशी शिवसेनेचे आमदार नीलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली येथील महालक्ष्मी सभागृहात आमसभा झाली.
'जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत. त्यासाठी प्रशासनाने काम केले पाहिजे. त्यामुळे या आमसभेत अधिकार्यांनी दिलेली उत्तरे लक्षात ठेवावीत. त्याचा पाठपुरावा मी करत रहाणार. जनतेचे प्रश्न सोडवण्यात कोणताही हलगर्जीपणा करू नये', अशा स्पष्ट सूचना आमदार नीलेश राणे यांनी या आमसभेत प्रशासनाला दिल्या.
या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूशे आदी व्यासपिठावर उपस्थित होते. या सभेत प्रशासनाच्या विविध विभागांच्या कारभाराविषयी उपस्थितांनी अप्रसन्नता व्यक्त केली.
आमदार नीलेश राणे यांनी अधिकार्यांना धरले धारेवर : हलगर्जीपणा चालणार नसल्याची दिली सक्त सूचना
१. कुडाळ नगरपंचायतीविषयी प्रश्न उपस्थित करण्यात आला होता; मात्र उत्तर देण्यासाठी कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने कुणीही नव्हते. तसेच मुख्याधिकारी सभेला अनुपस्थित होते. त्यामुळे आमदार नीलेश राणे यांनी तातडीने त्यांना संपर्क करून बोलावून घेतले.
२. दूरसंचार विभागाच्या अधिकार्यांना काढले सभागृहाच्या बाहेर
दूरसंचार विभागाचे अधिकारी पुरेशी माहिती न घेता आणि वरिष्ठ अधिकार्यांच्या अनुपस्थितीत सभागृहात आले. विचारलेल्या प्रश्नांना नीट उत्तरे देता न आल्याने आणि हिंदी भाषेचा वापर करत सभागृहाची दिशाभूल केल्याने आमदार राणे यांनी 'तुम्हाला प्रश्नाविषयी माहिती देता येत नाही, हे चालणार नाही. ज्यांना स्थानिक प्रश्नांची जाण नाही आणि ज्यांना माहिती देता येत नाही, अशा लोकांनी तात्काळ सभागृह सोडावे', अशा कडक शब्दांत आमदार राणे यांनी त्या अधिकार्याला सभागृहाच्या बाहेर काढले.
३. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनुपस्थित अधिकार्यांना तात्काळ सभागृहात उपस्थित रहाण्यास भाग पाडले !
आमसभेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांचा आणि तक्रारींचा पाढा वाचला जात असतांनाच या विभागाचे कुडाळचे उपअभियंता पिसाळ हे सभेत अनुपस्थित असल्याचे आमदार नीलेश राणे यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे आमदार राणे चांगलेच संतापले. त्यांनी कसलाही विलंब न लावता भर सभागृहातूनच पिसाळ यांना संपर्क करून सर्वांसमोर त्यांची कानउघडणी केली आणि तातडीने सभागृहात उपस्थित रहाण्यास भाग पाडले.
४. अन्य विभागांचे जे अधिकारी अनुपस्थित होते किंवा योग्य प्रकारे उत्तरे देऊ शकले नाहीत, त्यांना आमदार राणे यांनी चांगलेच खडसावले. यासह आरोग्य, एस्.टी. सेवा, महावितरण यांसह अन्य खात्यांच्या अधिकार्यांनाही आमदार राणे यांनी खडसावले.
आमसभेत एकूण १२५ निवेदने आणि सूचना आल्या होत्या, असे गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी सांगितले. प्रफुल्ल वालावलकर हे सेवानिवृत्त होणार असल्याने त्यांच्या ३३ वर्षांच्या सेवेबद्दल त्यांचा आमदार नीलेश राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

