ठाणे, ४ जुलै (वार्ता.) - मुंबई हवामान विभागाने दिलेल्या 'रेड अलर्ट'च्या (अतीदक्षतेच्या) पार्श्वभूमीवर ४ जुलैला ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस कोसळल्याने जनजीवन विस्कळीत झाले.
ठाणे, कल्याण-डोंबिवली, टिटवाळा उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी येथील सखल भागांत पाणी साचले. त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला, तर काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले. ठाणे येथील खारेगाव परिसरात झाड पडल्याने २ जण घायाळ झाले. कल्याण-अहिल्यानागर मार्गावरील माळशेज घाटात दुपारी मोठी दरड कोसळली. महामार्ग पोलीस आणि तहसील प्रशासन यांनी तत्परता दाखवत अवघ्या २० ते २५ मिनिटांत दरड हटवून वाहतूक पूर्णपणे सुरळीत केली असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
१. पालघर जिल्ह्यातही मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले, वसई-विरार शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचल्याने अंतर्गत वाहतूक, तसेच महामार्ग आणि राज्यमार्गांवरील वाहतूक संथ झाली. मुसळधार पावसाचा लोकल सेवेवरही परिणाम झाला असून गाड्या विलंबाने धावत होत्या.
२. ठाणेसह दिवा, मुंब्रा आणि कळवा परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. वंदना चौकात साचलेल्या पाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या पदाधिकार्यांनी टायर ट्यूबमध्ये बसून आंदोलन करत नालेस्वच्छतेच्या कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भिवंडीत काही ठिकाणी गुडघाभर पाणी साचल्याने अवजड वाहनांची वाहतूक संथगतीने चालू होती, तर लहान वाहनांना मोठा फटका बसला.
३. कल्याण येथे बैठ्या चाळ्यांमध्ये पाणी शिरले. डोंबिवलीत रस्ते जलमय झाले असून नाल्यांमधील पाणी आस्थापनांमध्ये आणि रस्त्यांवर आल्याने नागरिक अन् उद्योजक यांना अडचणींचा सामना करावा लागला. टिटवाळा येथील मांडा, बनेली आणि बल्याणी परिसरात अनधिकृतरित्या घातलेला भराव अन् अनधिकृत चाळी उभारल्याने पाण्याच्या नैसर्गिक निचर्याचे मार्ग बंद झाले आहेत.

