नाशिक - त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या नावाचा गैरवापर करून बनावट भ्रमणभाष ॲप आणि संकेतस्थळ यांद्वारे ऑनलाइन अभिषेकाच्या नावाखाली भाविकांची फसवणूक केली जात आहे. अवघ्या २१, ५१ आणि १०१ रुपयांत अभिषेक, छायाचित्रे अन् व्हिडिओ उपलब्ध करून देण्याचे आमीष दाखवत काही अनधिकृत संकेतस्थळे भाविकांकडून पैसे उकळत असल्याचे समोर आले.
या प्रकरणी देवस्थान ट्रस्टने सायबर पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Misuse of Trimbakeshwar Devasthan Trust's Name to Cheat Devotees!
• Fake "Online Abhishek" offers for just ₹21, ₹51 & ₹101 are being used to lure devotees through fraudulent apps and websites.
• The official online puja fee is ₹2,100 and bookings can be made only through… https://t.co/RTbyZKLAhrpic.twitter.com/MyPdrt77YM
- Sanatan Prabhat (@SanatanPrabhat)
१. अधिकृत व्यवस्थेनुसार त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या संकेतस्थळावर २ सहस्र १०० रुपये शुल्क भरून ऑनलाइन पूजा नोंदणी करता येते. भाविकांनी नाव आणि गोत्र नोंदवल्यानंतर अधिकृत पुरोहितांकडून पूजा केली जाते. त्या पूजेची छायाचित्रे आणि व्हिडिओ भाविकांना पाठवले जातात. या शुल्कातील ६० टक्के रक्कम पुरोहितांना, तर ४० टक्के रक्कम देवस्थान ट्रस्टला मिळते.
२. काही बनावट ॲप आणि संकेतस्थळे यांनी ट्रस्टचे, मंदिराची छायाचित्रे आणि धार्मिक माहिती यांचा अनधिकृत वापर करून भाविकांना आकर्षित केले. 'श्रावण सोमवार जलाभिषेक', 'गोदावरी जलाभिषेक', 'बिल्वपत्र अभिषेक' आणि 'विशेष अभिषेक' अशा विविध सेवांच्या नावाखाली ऑनलाइन नोंदणी केली जाते. त्यासाठी अत्यल्प शुल्क आकारले जात आहे.
३. देवस्थान ट्रस्ट अशा प्रकारच्या पूजा करत नाही. त्यामुळे भाविकांची फसवणूक होत असल्याचे उघड झाले.
४. ट्रस्टने पोलिसांकडे तक्रार केली असून बनावट ॲप, संकेतस्थळे आणि सामाजिक माध्यमे यांद्वारे दिशाभूल करणार्या विज्ञापनांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. 'भाविकांनी केवळ देवस्थान ट्रस्टच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच ऑनलाइन पूजेची नोंदणी करावी', असे आवाहनही करण्यात आले आहे.
त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे प्रशासकीय अधिकारी अमित माचवे म्हणाले, ''या प्रकरणी सायबर गुन्हे शाखेच्या साहाय्याने कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.''

