Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका यांमुळे कारवाईची चेतावणी

वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका यांमुळे कारवाईची चेतावणी

पाचल, २ जून (वार्ता.) - तालुक्यातील पाचल बाजारपेठ परिसरातील अनधिकृत बांधकामावर (अतिक्रमणावर) सार्वजनिक बांधकाम विभागाने तीव्र आक्षेप घेतला आहे. ते बांधकाम तातडीने हटवण्याची नोटीस संबंधितांना बजावली आहे.

ही नोटीस ८४ जणांना पाठवण्यात आली आहे.
विठापेठ-मलकापूर-अणुस्कुरा-साटवली-पावस या राज्य मार्ग क्रमांक १५० वर पाचल बाजारपेठ येथे रस्त्याच्या मध्यबिंदूपासून साधारण ८.५० मीटर अंतरावर पत्राशेड उभारण्यात आल्या आहेत. या बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची (PWD) कोणतीही पूर्वअनुमती घेण्यात आलेली नाही. या अनधिकृत बांधकामामुळे बाजारपेठेतील वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असून अपघाताचा धोका कमालीचा वाढला आहे, असे सार्वजनिक बांधकाम विभाग, राजापूर उपविभाग कार्यालयाने जारी केलेल्या नोटिसीमध्ये नमूद केले आहे.

पाचल बाजारपेठेतील वाढती वाहतूक कोंडी, रस्त्यालगत उभी रहाणारी वाहने आणि रस्त्यावरील अतिक्रमणे यांमुळे स्थानिक नागरिक आणि पादचारी यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या संदर्भात स्थानिक नागरिक आणि ग्रामपंचायतीने यापूर्वीच सार्वजनिक बांधकाम मंत्री अन् जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची नोंद घेत प्रशासनाने संबंधितांना अतिक्रमण स्वतःहून त्वरित हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुदतीत बांधकाम न हटवल्यास शासकीय नियमांनुसार कायदेशीर कारवाई करून हे अतिक्रमण हटवले जाईल, तसेच या अनधिकृत बांधकामामुळे भविष्यात कोणताही अपघात घडल्यास त्याची संपूर्ण फौजदारी आणि कायदेशीर दायित्व संबंधितांवर राहील, अशी कडक चेतावणीही सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi