कुडाळ - सध्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात वन विभागाच्या वतीने वन महोत्सवांतर्गत वृक्ष लागवड करण्यात येत आहे. यामध्ये मानवी आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असणार्या दुर्मिळ औषधी वनस्पतींच्या रोपांची लागवड करण्यावर भर दिला जात आहे.
या पार्श्वभूमीवर कुडाळ तालुक्यातील नेरूर परिसरात 'नरक्या' या बहुमूल्य आणि अत्यंत गुणकारी औषधी वनस्पतीच्या ७०० रोपांची लागवड करण्यात आली आहे.
'नरक्या' ही वनस्पती कर्करोगासारख्या (कॅन्सरसारख्या) अत्यंत घातक आणि गंभीर आजारावरील उपचारांसाठी अत्यंत उपयुक्त मानली जाते. या वनस्पतीची साल, खोड आणि मुळे यांचा औषधी उपचारांमध्ये प्रामुख्याने वापर केला जातो. त्यामुळे या दुर्मिळ वनस्पतीचे संवर्धन करणे काळाची आवश्यकता बनली आहे. वन विभागाच्या या पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
'नरक्या' वनस्पतीविषयी अधिक माहिती
'नरक्या' वनस्पतीचे शास्त्रीय नाव Nothapodytes nimmoniana असे आहे. ही सह्याद्री आणि पश्चिम घाट येथे आढळणारी एक अत्यंत महत्त्वाची आणि दुर्मिळ औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीचा उपयोग प्रामुख्याने कर्करोगावरील आधुनिक औषध निर्मितीसाठी केला जातो. या वनस्पतीला 'घाणेरा' किंवा 'घाणमारी', असेही म्हणतात.

