मुंबई - काही दिवसांपूर्वी वांद्रे (पूर्व) भागात रेल्वेस्थानकाजवळील गरीबनगरमधील ४०० हून अधिक अतिक्रमणे पाडण्यात आली. या कारवाईचा सूड घेण्यासाठी मुंबईत आतंकवादी आक्रमणाचा कट रचण्यात आला होता.
देहली पोलिसांच्या अन्वेषणात ही माहिती समोर आली. या प्रकरणाच्या अनुषंगाने मुंबईत अतीदक्षतेची चेतावणी देण्यात आली आहे. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
१. अटक केलेल्या आतंकवाद्यांच्या निशाण्यावर मुंबईतील पोलीस कर्मचारी, सुरक्षा यंत्रणा आणि शहरातील काही अतीमहत्त्वाची अन् गर्दीची ठिकाणे होती. पोलिसांवर आक्रमण करून आणि महत्त्वाच्या ठिकाणी स्फोट घडवून शहरात दहशत पसरवण्याचा त्यांचा उद्देश होता. (हा कट वेळीच उघड झाला, अन्यथा मुंबईत किती मोठी भीषण स्थिती ओढावली असती, याची कल्पनाही करू शकत नाही ! - संपादक)
२. पोलिसांनी त्यांच्याकडून भ्रमणभाष, तसेच विविध उपकरणे यांद्वारे त्यांनी ध्वनीमुद्रित केलेले व्हिडिओ आणि छायाचित्रे जप्त केली आहेत. त्यांनी शहराची टेहाळणी केली असल्याचेही समजते. त्यांचे परदेशातील त्यांच्या 'हँडलर्स'शी (भारतात आतंकवादी कारवाया करण्यासाठी नियंत्रण आणि संचालन करणारे लोक) झालेले संभाषण अन्वेषण यंत्रणांना सापडले.
३. पाकिस्तानस्थित गुप्तचर संस्था 'आय.एस्.आय.' (इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स - आंतरसेवा गुप्तचर यंत्रणा) आणि कुख्यात गुंड मुन्ना झिंगाडा यांच्यासह अन्य काही प्रमुख विदेशी सूत्रधार या कटात सहभागी असल्याचा संशय आहे.

