अलीकडेच ब्रिटनने आपल्या भावी पिढीला तंबाखूच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी 'जनरेशन बॅन' हा कायदा संमत केला आहे. याविषयीची माहिती आणि भारताने करावयाचे प्रयत्न यांविषयी आपण २६ एप्रिल २०२६ या दिवशीच्या लेखात वाचले.
सरकारी स्तरावर होणारे असे कायदेशीर प्रयत्न स्वागतार्ह आहेतच; परंतु केवळ बाह्य कायद्याने व्यसनमुक्ती पूर्ण होऊ शकत नाही. जोपर्यंत माणसाची आंतरिक ओढ आणि मानसिक संस्कार पालटत नाहीत, तोपर्यंत व्यसन पुन्हा डोके वर काढते. म्हणूनच व्यसनमुक्तीचा विचार करतांना आधुनिक वैद्यकशास्त्रासह मानस-आध्यात्मिक उपचारांचे साहाय्य घेणे, ही काळाची आवश्यकता आहे. सनातन संस्थेच्या वतीने विविध व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये 'व्यसनमुक्तीसाठी मानसोपचार आणि आध्यात्मिक उपचार' या विषयावर व्याख्याने घेण्यात आली. या आयोजित केल्या जाणार्या व्याख्यानांच्या विषयांचा सारांश लेखस्वरूपात पुढे दिला आहे.
(उत्तरार्ध)
पूर्वार्ध वाचण्यासाठी क्लिक करा →https://sanatanprabhat.org/marathi/1033901.html
सामान्यतः व्यसन म्हणजे सिगारेट, दारू किंवा अमली पदार्थांचे सेवन असे मानले जाते. कोणत्याही बाह्य वस्तूवर, व्यक्तीवर किंवा कृतीवर मनाची इतकी परावलंबिता निर्माण होते की, त्याखेरीज व्यक्तीला चैन पडू नये आणि ती गोष्ट शरिरासाठी घातक असूनही ती सोडणे कठीण जाणे, म्हणजे व्यसन. हे केवळ शरिराचे आजार नसून 'मनाचे दुर्बलीकरण' आहे.
२ अ. मानसिक कारणे : पुढील प्रकारची असतात.
२ अ १. तणाव आणि चिंता : आजच्या धावपळीच्या युगात तणाव विसरण्यासाठी लोक तात्पुरता विरंगुळा म्हणून व्यसनाकडे वळतात.
२ अ २. भावनिक रिक्तता : एकटेपणा, नैराश्य किंवा प्रेमाचा अभाव यांमुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी मन उत्तेजक पदार्थांचा आधार घेते.
२ अ ३. इंद्रिय सुखाची ओढ : मनावर ताबा नसल्यामुळे इंद्रियांना मिळणार्या क्षणिक सुखाला माणूस स्वतःचे सर्वस्व मानू लागतो.
२ अ ४. संस्कारांचा अभाव : मनावर संयम अन् ध्येयवादी जीवन यांचे संस्कार नसल्यास मन सहजपणे कनिष्ठ सुखांकडे ओढले जाते.
२ आ. आध्यात्मिक कारणे : पुढील प्रकारची असतात.
२ आ १. पितृदोष : काही वेळा मृत्यूनंतर सद्गती न मिळालेल्या अतृप्त पितरांच्या त्रासामुळे, म्हणजेच पितृदोषामुळे व्यसन जडते.
२ आ २. कर्मदोष (प्रारब्ध) : अध्यात्मशास्त्रानुसार काही व्यक्तींमध्ये व्यसनाधीनता ही पूर्वजन्मीचे संस्कार किंवा प्रारब्ध यांमुळे असते.
२ आ ३. अनिष्ट शक्तींचा प्रभाव : अनेकदा व्यक्तीची सात्त्विकता अल्प असल्यास बाह्य नकारात्मक लहरी किंवा अनिष्ट शक्ती व्यक्तीला व्यसनाकडे प्रवृत्त करतात.
२ आ ४. प्राणशक्तीची न्यूनता : आध्यात्मिक दृष्टीकोनातून शरिरातील 'प्राणशक्ती' न्यून झाली की, नकारात्मक सवयी लवकर जडतात.
व्यसनमुक्ती समजून घेण्यासाठी मनाचे कार्य समजणे आवश्यक आहे. मानवी मनाचे २ मुख्य भाग आहेत : बाह्यमन (Conscious Mind) आणि अंतर्मन (Subconscious Mind).
अ. बाह्यमन : हे केवळ १० टक्के असते. यात तर्क आणि निर्णयशक्ती असते.
आ. अंतर्मन : हे ९० टक्के असून यात कोट्यवधी जन्मांचे संस्कार असतात.
जेव्हा एखादी व्यक्ती व्यसन करते, तेव्हा त्या सुखाचा 'संस्कार' अंतर्मनात एका केंद्राच्या रूपात सिद्ध होतो. बाह्यमनाला व्यसन वाईट आहे, हे कळते; पण अंतर्मनातील 'व्यसन केंद्र' इतके प्रबळ असते की, ते बुद्धीला पराभूत करते. म्हणूनच व्यसनमुक्तीसाठी अंतर्मनातील हे केंद्र नष्ट करणे किंवा त्यावर नवीन संस्कार करणे आवश्यक असते.
स्वयंसूचना ही बुद्धीने अंतर्मनाला (Subconscious Mind) दिलेली सकारात्मक आज्ञा आहे. व्यसनमुक्तीच्या प्रक्रियेत 'स्वयंसूचना' अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. स्वतःच्या अंतर्मनावर झालेले जुने संस्कार पुसून तिथे नवीन, सकारात्मक विचारांची पेरणी करणे, हा यामागचा मुख्य उद्देश असतो.
४ अ. प्रतिबंधात्मक स्वयंसूचना (जेव्हा व्यसनाची ओढ नसते) : तंबाखू , सिगारेट, मद्य, अमली पदार्थ हे माझ्या शरिरासाठी आणि कुटुंबासाठी घातक आहे, याची मला जाणीव आहे. त्यामुळे मी कोणत्याही परिस्थितीत तंबाखू घेणार नाही आणि माझे आरोग्य उत्तम ठेवीन.
४ आ. प्रसंगावधानाविषयी स्वयंसूचना (जेव्हा तीव्र ओढ निर्माण होते) : जेव्हा मला तंबाखू , सिगारेट, मद्य, अमली पदार्थ यांचे सेवन करण्याची तीव्र इच्छा होत आहे; परंतु तेव्हा मी जाणतो की, ही इच्छा क्षणभंगूर आणि माझ्यासाठी घातक आहे. तेव्हा मी माझ्या श्वासावर लक्ष केंद्रित करत आहे आणि ही ओढ हळूहळू न्यून होत आहे. मी व्यसनापेक्षा अधिक सामर्थ्यवान आहे, हे मी अनुभवत आहे.
४ इ. प्रगतीदर्शक स्वयंसूचना (रात्री झोपतांना) : आजचा पूर्ण दिवस मी व्यसनाविना आनंदाने घालवला. माझ्या मनाची शक्ती वाढत आहे आणि मी पूर्णपणे व्यसनमुक्त होत आहे.
४ ई. स्वयंसूचना देण्याचे नियम
४ ई १. श्रद्धा आणि विश्वास : स्वयंसूचना देतांना त्यावर तुमचा पूर्ण विश्वास असणे आवश्यक आहे. 'मी प्रयत्न करीन', असे म्हणण्याऐवजी 'मी करत आहे' किंवा 'मी केले आहे', अशा वर्तमानकाळी भाषेचा वापर करा.
४ ई २. एकाग्रता : सूचना देतांना डोळे मिटून त्या शब्दांचा अर्थ अनुभवा.
४ ई ३. सातत्य : न्यूनतम ३ सप्ताह सातत्याने स्वयंसूचना द्या. नंतर स्वयंसूचनांच्या परिणामांचा अभ्यास करून नवीन स्वयंसूचना सिद्ध करा. दिवसांतून ९ ते १२ वेळा स्वयंसूचना द्या !
या स्वयंसूचना मनाला एक नवीन दिशा देतील अन् व्यसनाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी आंतरिक बळ देतील.

'नामजप' हा व्यसनमुक्तीसाठीचा महत्त्वपूर्ण उपाय आहे. जेव्हा एखादी व्यक्ती तिच्या इष्टदेवतेचा किंवा कुलदेवतेचा नामजप करते, तेव्हा अंतर्मनात एक नवीन 'नामजप केंद्र' तयार होऊ लागते.
५ अ. विक्षेपण पद्धत (Deflecting Channel) : जसजसा नामजप वाढतो, तसा व्यसन केंद्राला मिळणारी ऊर्जा नामजप केंद्राकडे वळते.
५ आ. सात्त्विकतेची वाढ आणि तमोगुणाचा नाश : आयुर्वेद आणि अध्यात्म यांनुसार व्यसने ही तामसिक (जड अन् अज्ञानी) वृत्तीमुळे जडतात. तामसिक वृत्ती माणसाला स्वतःच्या विनाशाकडे नेते. देवतेचे नाव हे सात्त्विक आहे. निरंतर नामजप केल्याने शरिरातील आणि मनातील सत्त्वगुण वाढतो. जसा सत्त्वगुण वाढतो, तशी तामसिक पदार्थांची (तंबाखू, मद्य) ओढ नैसर्गिकरित्या न्यून होते.
५ इ. निर्णयक्षमता आणि इच्छाशक्तीचे बलीकरण : व्यसनी व्यक्तीची 'बुद्धी' दुबळी झालेली असते. तिला 'वाईट काय हे कळते'; पण ते टाळता येत नाही. नामजपामुळे मनाची एकाग्रता वाढते आणि आत्मशक्ती प्रबळ होते. नामजपामुळे 'विज्ञानमय कोश' (Intellectual Sheath) शुद्ध होतो. त्यामुळे माणसाची निर्णयक्षमता सुधारते.'मला हे व्यसन नको आहे', हा संकल्प तडीस नेण्याचे सामर्थ्य नामजपातून मिळणार्या ऊर्जेमुळे प्राप्त होते.
५ ई. रासायनिक संतुलन (Chemical Balancing) : विज्ञानाच्या भाषेत सांगायचे, तर व्यसनामुळे मेंदूतील 'डोपामाईन'चे (Dopamine) चक्र बिघडलेले असते. संशोधनानुसार जेव्हा एखादी व्यक्ती एकाग्रतेने नामजप किंवा ध्यान करते, तेव्हा मेंदूत 'सेरोटोनिन' आणि 'एंडोर्फिन' यांसारखी आनंदी संप्रेरके (Happiness Hormones) स्रवतात. यामुळे व्यक्तीला तणावमुक्त आणि प्रसन्न वाटते; परिणामी कृत्रिम नशेकडे वळण्याची आवश्यकता भासत नाही.
५ उ. नामजप कोणता करावा ?
१. कुलदेवतेचा नामजप करावा. कुलदेवता ज्ञात नसल्यास 'श्री कुलदेवतायै नमः ।' हा जप करावा.
२. पितृदोषामुळे व्यसनाधिनता असल्यास 'श्री गुरुदेव दत्त' हा नामजप प्रतिदिन ३ घंटे करावा. ६ महिन्यांनी व्यसनाच्या तीव्रतेचा आढावा घेऊन नामजपाचा कालावधी कमी-अधिक करावा.
केवळ नामजपच नाही, तर इतर काही पूरक उपायही तितकेच प्रभावी ठरतात.
६ अ. प्राणायाम : व्यसनामुळे फुफ्फुस आणि रक्ताभिसरण बिघडलेले असते. अनुलोम-विलोम आणि भ्रामरी प्राणायामामुळे मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळतो. यामुळे मनाची चंचलता न्यून होते आणि इच्छाशक्ती वाढते.
६ आ. सत्संग : संगतीचा परिणाम हा व्यसन वाढवण्यास किंवा न्यून करण्यास कारणीभूत ठरतो. आध्यात्मिक विचारांच्या लोकांमध्ये राहिल्याने व्यसनमुक्तीच्या संघर्षात नैतिक बळ मिळते. सनातन संस्थेच्या वतीने साप्ताहिक साधना सत्संग आयोजित केले जातात. त्यात सहभागी होता येऊ शकते.
६ इ. प्रार्थना : 'हे देवते (देवतेचे प्रत्यक्ष नाव घेऊन), मला या व्यसनातून बाहेर पडण्यासाठी बळ दे', अशी कळकळीची प्रार्थना केल्यास व्यसनमुक्तीसाठी ईश्वराचे आशीर्वाद प्राप्त होतात.
व्यसनमुक्ती हा केवळ औषधांचा विषय नसून तो मनाच्या पुनर्रचनेचा आणि आध्यात्मिक त्रासांचा विषय आहे. आधुनिक विज्ञान शरिरावरील उपचार करील; पण अध्यात्मशास्त्र मनाचा कायापालट करील. नामजप, स्वयंसूचना आणि सात्त्विक जीवनशैली यांच्या समन्वयातून आपण एक व्यसनमुक्त, सुदृढ आणि आनंदी समाज घडवू शकतो. ब्रिटनने कायदा केला आहे, तसेच कायदे भारतातही हवेत आणि त्यासह सनातन संस्थेसारख्या विविध आध्यात्मिक संस्थांकडून केले जाणारे आध्यात्मिक प्रबोधनही तितकेच महत्त्वाचे आहे.
(समाप्त)
- श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था. (२४.४.२०२६)

