मुंबई - येत्या जूनपासून चालू होणार्या शैक्षणिक सत्रापासून इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीसह सहावीचाही नवीन अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे, असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.
मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत इयत्ता सहावीच्या अभ्यासक्रम आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे.
शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे म्हणाले, ''राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार काठिण्यपातळी निश्चित करून अध्ययन निष्पत्तीवर आधारित अभ्यासक्रम आराखडा ठरवण्यात आला आहे. यास 'राज्य सुकाणू समिती'च्या बैठकीत संमती देण्यात आली. यानंतर या प्रारूपाला शालेय शिक्षण आयुक्तांकडे असलेल्या अभ्यासक्रम समन्वय समितीकडून मान्यता मिळाल्यानंतर त्यासाठीची पाठ्यपुस्तके बालभारतीकडून तातडीने सिद्ध करून ती येत्या शैक्षणिक सत्राच्या प्रारंभीच उपलब्ध करून दिली जातील.''

