Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून सपकाळांचा सरकारवर हल्लाबोल

आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून सपकाळांचा सरकारवर हल्लाबोल

नाशिक : आदिवासी विद्यार्थी गेल्या १५ ते २० दिवसांपासून विविध मागण्यांसाठी उपोषण आणि आंदोलन करत असताना भाजपा महायुती सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

राहुल गांधी यांनी पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नात लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्यानंतर सरकार घाईघाईने त्यांच्या मागण्या मान्य असल्याचे सांगत आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवता येणार नाही, अशी टीका सपकाळ यांनी केली.

नाशिक येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि आदिवासी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विक्रांत भुरिया यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

'नाशिकमध्ये स्वतंत्र मंत्रिमंडळ बैठक घ्या'

नाशिक विभागात आदिवासींची लोकसंख्या मोठी असल्याने येथे मंत्रिमंडळाची स्वतंत्र बैठक घेऊन आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या तातडीने मंजूर कराव्यात, अशी मागणी सपकाळ यांनी केली. सरकारने केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष निर्णय घ्यावेत, असेही ते म्हणाले.

'आदिवासी विकास विभाग भ्रष्टाचाराचे कुरण'

आदिवासी विकास विभाग हा भ्रष्टाचाराचे कुरण बनला असून आदिवासींसाठीच्या योजनांचा पैसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, मागील दोन वर्षांत ८९२ आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून त्याला फडणवीस सरकार जबाबदार आहे. विभागातील अनागोंदी कारभार पाहता आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

बिंदूनामावलीतील कथित गैरप्रकार दूर करावा, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या भोजनाचा दर्जा सुधारावा आणि सेंट्रल किचन तातडीने बंद करावे, या विद्यार्थ्यांच्या मागण्या असल्याचे सपकाळ यांनी सांगितले. या सर्व मागण्या सरकारने तातडीने मंजूर कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

'राहुल गांधींच्या दौऱ्यामुळे सरकार खडबडून जागे'

राहुल गांधी २ सप्टेंबर रोजी नाशिक दौऱ्यावर येत असल्याने भाजपा सरकार घाईघाईने आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य असल्याचे सांगत आहे. मात्र, सरकारच्या आश्वासनांवर विश्वास ठेवता येणार नाही, असा दावा सपकाळ यांनी केला.

राहुल गांधी यांनी पुण्यातील 'छात्रों की गुंज' कार्यक्रमात आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. नाशिकप्रमाणेच पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि राज्यातील इतर ठिकाणीही आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आणि मोर्चाला काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा असून विविध ठिकाणच्या आंदोलनकर्त्यांच्या प्रतिनिधींची भेट घेणार असल्याचे सपकाळ यांनी सांगितले.

'छात्रों की गुंजमुळे भाजपची झोप उडाली'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील कार्यक्रमात राहुल गांधी यांच्या 'छात्रों की गुंज' अभियानावर केलेल्या टीकेलाही सपकाळ यांनी प्रत्युत्तर दिले. भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांची खोटे बोलण्याची शैली असल्याचा आरोप करत, 'छात्रों की गुंज' अभियानामुळे सरकारची झोप उडाल्याचे स्पष्ट दिसत असल्याची टीका त्यांनी केली.यावेळी विजय वडेट्टीवार आणि डॉ. विक्रांत भुरिया यांनीही आदिवासी विकास विभागातील कथित भ्रष्टाचार तसेच राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Shirur Taluka