Dailyhunt
भोर नसरापूर प्रकरण! आरोपीला फाशीचीच शिक्षा होणार;  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

भोर नसरापूर प्रकरण! आरोपीला फाशीचीच शिक्षा होणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : भोर तालुक्यातील नसरापूर येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याचा सरकारचा निर्धार असून, त्याला फाशीचीच शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी स्पष्ट केले.

नसरापूर ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी आमदार दिलीप लांडे यांच्या पुढाकाराने शिंदे यांची भेट घेऊन आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले. ग्रामस्थांनी सांगितले की, संबंधित आरोपीने यापूर्वीही अशाच प्रकारचे गुन्हे केले असून, त्याला शिक्षा होऊनही सुटका झाल्याने त्याची हिंमत वाढली. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावर प्रतिक्रिया देताना शिंदे म्हणाले की, या घटनेबाबत त्यांनी मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्याशी चर्चा केली असून, सरकार या प्रकरणाकडे अत्यंत गंभीरतेने पाहत आहे. पोलिसांना न्यायवैद्यक व इतर सर्व पुरावे काटेकोरपणे गोळा करण्याचे आणि लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

आरोपीवर सर्व गंभीर कलमे लावून तो कोणत्याही कारणावरून सुटणार नाही याची दक्षता घेतली जाईल. तसेच खटल्यासाठी अनुभवी सरकारी वकिलांची नियुक्ती केली जाणार असून, प्रकरणाचा दररोज आढावा घेतला जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.

पीडित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याचाही सरकारचा विचार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. "अशा प्रवृत्तींना आळा घालणे ही सरकारची जबाबदारी आहे आणि आरोपीला शिक्षा झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही," असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.दरम्यान, शिंदे यांनी पीडितेच्या वडिलांशी दूरध्वनीवरून संवाद साधून त्यांचे सांत्वन केले असून, न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Shirur Taluka