Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
चित्रनिर्मितीत AIचा वाढता वापर; चित्रनगरीत ५६ प्रशिक्षणार्थींना मिळाले आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण

चित्रनिर्मितीत AIचा वाढता वापर; चित्रनगरीत ५६ प्रशिक्षणार्थींना मिळाले आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण

मुंबई: चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेऊन महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने 'सृजन : संवाद कौशल्य' उपक्रमांतर्गत 'कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती' या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

चित्रनगरीतील चित्रांगण सभागृहात झालेल्या या कार्यशाळेत ५६ प्रशिक्षणार्थींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यशाळेत चित्रपट निर्मितीच्या पूर्वतयारीपासून निर्मिती, निर्मितीनंतरची प्रक्रिया तसेच प्रसार आणि विपणनापर्यंतच्या विविध टप्प्यांमध्ये AIचा प्रभावी वापर कसा करता येईल, याचे व्यावहारिक प्रशिक्षण देण्यात आले. पटकथा लेखन, दिग्दर्शन, छायांकन, दृश्य परिणाम, संकलन आणि डिजिटल आशयनिर्मिती याबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले.

AI आधारित चित्रपट निर्मिती तज्ज्ञ तेजस प्रभा विजय देऊस्कर, AI तंत्रज्ञान तज्ज्ञ जगजीत सिंग आणि AI आधारित चित्रपट निर्माते प्रशांत ठाकूर यांनी मार्गदर्शक म्हणून प्रशिक्षणार्थींना विविध तंत्रांची माहिती दिली. प्रत्यक्ष अनुभव आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून AIचा चित्रपट निर्मितीमध्ये सर्जनशील वापर कसा करता येतो, याची माहिती देण्यात आली.

कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, वित्तीय सल्लागार तथा मुख्य लेखा वित्त अधिकारी चित्रलेखा खातू आणि मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. विकास नाईक यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

चित्रपट क्षेत्रातील व्यावसायिक आणि नवोदितांना नव्या तंत्रज्ञानाची ओळख करून देणारी ही कार्यशाळा भविष्यातील चित्रनिर्मितीसाठी दिशादर्शक ठरेल, असे मत प्रशांत साजणीकर यांनी व्यक्त केले.

दरम्यान, "कृत्रिम बुद्धिमत्ता ही चित्रपट निर्मितीतील मानवी सर्जनशीलतेला पर्याय नसून तिची क्षमता अधिक व्यापक करणारे प्रभावी साधन आहे. या तंत्रज्ञानाचा योग्य आणि सर्जनशील वापर करून नवोदित तसेच व्यावसायिक चित्रपट निर्मात्यांना अधिक नाविन्यपूर्ण कलाकृती साकारता येतील. महाराष्ट्रातील चित्रपट क्षेत्राला बदलत्या तंत्रज्ञानाशी जोडत नव्या पिढीला अद्ययावत कौशल्ये उपलब्ध करून देणे, हा महामंडळाचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे," असे स्वाती म्हसे पाटील यांनी सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Shirur Taluka