Dailyhunt
डॉ. नीलम गोऱ्हे यांची विधानपरिषदेत बिनविरोध निवड; शिंदेंचा विश्वास सार्थ ठरवण्याचा निर्धार

डॉ. नीलम गोऱ्हे यांची विधानपरिषदेत बिनविरोध निवड; शिंदेंचा विश्वास सार्थ ठरवण्याचा निर्धार

मुंबई: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. सोमवारी (४ मे) महाराष्ट्र विधिमंडळाच्या विधानभवन येथे त्यांना अधिकृत निवड प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३० एप्रिल रोजी डॉ. गोऱ्हे आणि ओमप्रकाश (बच्चू) कडू यांना उमेदवारी दिली होती. २ मे रोजी झालेल्या छाननीनंतर इतर अर्ज तांत्रिक कारणांमुळे बाद झाल्याने नऊ जागांसाठी नऊ उमेदवार अशी स्थिती निर्माण झाली आणि निवडणूक बिनविरोध झाली.

या निवडीबाबत प्रतिक्रिया देताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, "उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे. त्या विश्वासाला न्याय देण्यासाठी मी कटिबद्ध आहे."

त्या पुढे म्हणाल्या की, महिला सुरक्षा, पीडित महिलांचे संरक्षण, विकासकामांना गती देणे आणि विधिमंडळातील जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडणे यावर आपला भर राहणार आहे. महायुतीतील सहकार्य तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला.या प्रसंगी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Shirur Taluka