Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
खड्ड्याने घेतला टीडीआरएफ जवानाचा जीव! अनेकांचे प्राण वाचवणारा विकास गोरे काळाच्या पडद्याआड

खड्ड्याने घेतला टीडीआरएफ जवानाचा जीव! अनेकांचे प्राण वाचवणारा विकास गोरे काळाच्या पडद्याआड

पघातानंतरच खड्डा बुजवला; पत्नीचा हृदयद्रावक आक्रोश, दोषींवर गुन्हा दाखल करण्याची नातेवाईकांची मागणी

ठाणे : संकटाच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अनेकांचे प्राण वाचवणाऱ्या ठाणे आपत्ती प्रतिसाद दल (टीडीआरएफ) जवान विकास गोरे (वय ३०) यांचा सोमवारी एका भीषण अपघातात मृत्यू झाला.

शहापूरहून ठाण्याकडे येत असताना नाशिक-मुंबई महामार्गावरील कळंभे गावाजवळ त्यांच्या दुचाकीचा मोठ्या खड्ड्यात धक्का बसल्याने हा अपघात झाला. या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.

शहापूर तालुक्यातील बामणे गावचे रहिवासी असलेले विकास गोरे हे धाडसी टीडीआरएफ जवान म्हणून ओळखले जात होते. काही दिवसांपूर्वी भिवंडीतील कोहिनूर इमारत दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांच्या मदतकार्यात त्यांनी जीवाची बाजी लावत सहभाग घेतला होता. पूर, इमारत दुर्घटना आणि इतर आपत्तीच्या काळात त्यांनी अनेकांचे प्राण वाचवण्यासाठी धाडसी कामगिरी बजावली होती. मात्र, अशा जवानाचा रस्त्यावरील खड्ड्यामुळे मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

अपघातानंतर गोरे यांच्या नातेवाईकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातील संबंधित अधिकारी आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दोषींवर कारवाईचे आश्वासन मिळाल्यानंतरच त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला.

विशेष म्हणजे, ज्या खड्ड्यामुळे हा अपघात झाला तो खड्डा अपघातानंतर तातडीने बुजविण्यात आला. मात्र, परिसरातील इतर खड्डे तसेच असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. एखादा बळी गेल्यानंतरच प्रशासन जागे होते का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दोन वर्षांपूर्वीच विकास गोरे यांचा विवाह झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन जुळ्या मुली असा परिवार आहे. मुलीची तब्येत बरी नसल्याने संध्याकाळी तिला दवाखान्यात घेऊन जाऊ, असे सांगून घराबाहेर पडलेल्या विकास यांच्या मृत्यूची बातमी समजताच पत्नी कविता गोरे यांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे डोळे पाणावणारा होता.

दरम्यान, ठाणे-भिवंडी मार्ग, मुंबई-नाशिक महामार्ग आणि घोडबंदर रोडवरील खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत असून अनेक निष्पाप नागरिकांचा जीव जात आहे. रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून निष्काळजी अधिकारी आणि निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Shirur Taluka