Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मुंबई विद्यापीठाच्या CDOE कारभाराविरोधात राष्ट्रवादीचा एल्गार; ७ दिवसांत निकाल जाहीर न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

मुंबई विद्यापीठाच्या CDOE कारभाराविरोधात राष्ट्रवादीचा एल्गार; ७ दिवसांत निकाल जाहीर न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

निकालात विलंब, सामूहिक नापास, मोफत पुनर्तपासणी आणि दोषींवर कारवाईची मागणी; ॲड. अमोल मातेले यांचे विद्यापीठ प्रशासनाला निवेदन.

मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्राच्या (CDOE/IDOL) कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे.

प्रदेश प्रवक्ते ॲड. अमोल मातेले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शुक्रवारी CDOE संचालकांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत निवेदन सादर केले. येत्या सात दिवसांत सकारात्मक निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.

मातेले यांनी आरोप केला की, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम ८९ नुसार परीक्षा संपल्यानंतर ४५ दिवसांत निकाल जाहीर करणे बंधनकारक असतानाही CDOE चे निकाल चार-चार महिने प्रलंबित आहेत. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि व्यावसायिक भविष्य अडचणीत आले आहे.

एमएमएस अभ्यासक्रमातील ६० पैकी तब्बल ५२ विद्यार्थ्यांना नापास करण्यात आल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. अंतर्गत मूल्यमापनात चांगले गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेत शून्य गुण देण्यात आल्याने उत्तरपत्रिका तपासणी प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे त्यांनी म्हटले.

राष्ट्रवादीने अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची मोफत पुनर्तपासणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती विनामूल्य उपलब्ध करून देणे, सामूहिक नापास प्रकरणाची चौकशी करून दोषी तपासणीदारांवर कारवाई करणे तसेच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) आणि क्रेडिट पद्धतीबाबत विद्यार्थ्यांमधील गोंधळ दूर करण्याची मागणी केली आहे.

यावेळी ॲड. अमोल मातेले म्हणाले, "मुंबई विद्यापीठासारखी प्रतिष्ठित संस्था विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू शकत नाही. पुढील सात दिवसांत सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेऊन प्रलंबित निकाल जाहीर न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल."

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Shirur Taluka