Dailyhunt
मुंबईच्या पवई-चांदिवली उद्यानांना 'सुरक्षा कवच'; गैरप्रवृत्तींवर विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश

मुंबईच्या पवई-चांदिवली उद्यानांना 'सुरक्षा कवच'; गैरप्रवृत्तींवर विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश

मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा घालण्यासाठी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याचे निर्देश राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र विधानसभा नियम १०५ अंतर्गत लक्षवेधी क्र. २१६२ संदर्भात ही बैठक पार पडली.

विधिमंडळ अधिवेशनादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गृहनिर्माण विभागाची अतिरिक्त जबाबदारी मिळाल्यानंतर सार्वजनिक ठिकाणांची सुरक्षितता, कायदा-सुव्यवस्था आणि नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीत संवेदनशील उद्यानांमध्ये टप्प्याटप्प्याने माजी सैनिक सुरक्षा महामंडळाच्या सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात आले. नागरिकांना अधिक त्रास होत असलेल्या ठिकाणांपासून ही मोहीम सुरू करण्यावर भर देण्यात आला.

तसेच अंमली पदार्थ सेवन व समाजविघातक हालचालींवर आळा घालण्यासाठी मुंबई पोलीस प्रशासनाने 'मिशन मोड'मध्ये विशेष मोहीम राबवावी, संशयितांवर कठोर कारवाई करावी आणि प्रतिबंधात्मक उपाय अधिक प्रभावी करावेत, असेही निर्देश देण्यात आले.

"सार्वजनिक उद्यानांचा गैरवापर सहन केला जाणार नाही. नागरिकांच्या सुरक्षिततेला बाधा आणणाऱ्या कोणत्याही प्रवृत्तीविरोधात प्रशासन ठामपणे उभे राहील," असे स्पष्ट मत मंत्री देसाई यांनी व्यक्त केले.

या बैठकीस आमदार दिलीप लांडे, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाचे उपायुक्त अजितकुमार आंबी, मुंबई पोलीस झोन १० चे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे तसेच स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Shirur Taluka